

औद्योगिकीकरण,नागरीकरणाच्या नावाखाली उरण तालुक्यात सुरू असलेल्या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे भराव टाकले जात आहेत.हे भरावच आता उरणला धोकादायक ठरू लागलेले आहे.नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतच बंद झाल्याने ऐन पावसाळ्यात उरण तालुक्याला या भरावांमुळे पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होणार आहे.याची प्रचिती गेल्याच आठवड्यात आल्याने उरणकरांना धास्ती लागली आहे.
पूर्व विभागातील अनेक गावांतील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना भराव झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचन्याचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने या मार्गाने जाणार्या जड वाहने आणि लहान वाहने यांची शाब्दिक चकमक होत असल्याचे दिसून येत.ज्या बाजूने हे पाणी येत होते त्या बाजूही भरावामुळे भरल्याने पाणी जाण्यासाठी मार्गच उरले नाहीत त्यामुळे येथे पाणी साचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
दिघोडे येथील तर संपूर्ण रस्ताच अशा कारणांमुळे पाण्याखाली जात असतो , याच मार्गावर दोन्ही बाजूने भराव करण्यात आल्याने पाणी पुर्ण रस्त्यावर साचून राहिले जात आहे. तर पाणी निघण्यासाठी मार्ग नसल्याकारणाने तलावाचे स्वरूप येथील रस्त्यांना प्राप्त होत असते. हे सर्व अधिकृत आणि अनधिकृतपणे कंटेनर यार्ड चालवणार्या सर्वांची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे. याच कंपन्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवत भरावाचे डोंगर रचल्याने अशा समस्या निर्माण होत आहेत. मागच्याच काही दिवसात सरकारने कंपनीच्या बाजूला रस्त्यासाठी जागा सोडावी याप्रकारचे जीआर काढला आहे.पण या व्यावसायिक मंडळींकडून बाजूचा असलेला जिल्हा परिदेचा रस्ताच गाड्या उभ्या करण्यासाठी उपयोगात आणण्यात येत असतो त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
यावर वेळोवेळी अनेकदा आंदोलने करून अनधिकृत पार्किंग बंद करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती. वाहतूक नियंत्रकांकडून यावर उपाय योजना करावी म्हणून तशी तंबीही देण्यात येत असते. परंतु काहीच दिवसांनी परत जैसे थे हेच या भागात दिसून येत असते. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर ही वाहने अनधिकृतपणे याच मार्गावर उभी राहतात. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर लहान वाहनांना मार्गच उरणार नसल्याचे बोलले जात आहे.
रस्त्यांच्या दुतर्फा रस्त्यांच्या उंची पेक्षा भराव असल्याने पाणी निचरा होत नाही त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत आणि यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येक कंटेनर यार्ड वाल्यांकडून पाणी निचरा होण्यासाठी मार्ग करून घेतले पाहिजेत, परंतु बांधकाम विभाग आहे की नाही असे सवाल आता जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहेत . एम एम आर डी ए सारखे सार्वजनिक मोठे प्रकल्प याच भागात होऊ घातले असतानाच या अशा समस्यांकडे जाणूनबुजून तर कानाडोळा करण्यात येत नाही ना अशी शंका विचारताना दिसून येत आहे.
भरमसाठ अवैध भराव संपूर्ण उरण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याने अनेक गावांतील घरांमध्ये पावसाचे तसेच काही गावांत उधाणाचे पाणी शिरले जात आहे. त्यामुळे येथील जनतेला मानसिक त्रास तर काहींना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.महत्वाचे म्हणजे ज्या भागात शहरांचे शिल्पकार हे बिरूद मिरवणारी सिडको असतानाच खुप गलथान कारभार होत असल्याने असे मानवनिर्मित पूर उरणमध्ये येत असतात.आता पावसाळा सुरू होत असल्याने उरणया महालन विभागातील जनता भीतीने जगत असल्याचे बोलले जात आहे. उरण शहरात ही मागच्या वर्षापासून पुर परिस्थिती निर्माण होत चालली असल्याने बाजार पेठ आता पाण्याखाली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.