

उरण (रायगड) : उरण शहरातील वाहतूक कोंडीवर महत्वपूर्ण उपाय असलेल्या उरण बाह्यवळण मार्गात नगरपरिषद हद्दीतील जमिनीचे भूसंपादन व पुनर्वसनासाठी लागणारा १२ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात हा बहुप्रतिक्षित मार्ग सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च आता ४५ कोटींच्या घरात गेलेला आहे.
निधी उपलब्ध होत नसल्याने या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी लागणारा निधी येत्या काही दिवसात उपलब्ध होईल आणि त्यामुळे सहा महिन्यात हा मार्ग प्रवासासाठी उपलब्ध होईल अशी माहीती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे. हा मार्ग रखडल्याने उरणच्या प्रवासी व नागरिकांना आणखी काही महिने या मार्गाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे. येथील लोकल, रस्ते मार्ग, जलमार्ग यांनी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरीवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरणची नागरीवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरणच्या सर्व मार्गावर सततच्या कोंडीने प्रवासी, नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण -करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उरण बाह्यवळण या मार्गाचा प्रस्ताव २००१ साली पहिल्या युती सरकारच्या काळात उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराला जोडणाऱ्या उरण पनवेल या मुख्य मार्गालगत मोरा मार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित होता. त्याचे भूमीपूजन ही करण्यात आले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २००८ ला तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सिडकोच्या निधीतून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. ४५ कोटींच्या घरात या बाह्यवळण मार्गाचा खर्च गेला आहे. या मार्गाचे काम वेगाने व्हावे याकरिता आ. महेश बालदी यांनी पाठपुरावा केला. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जमिनीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र सध्या सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या एलिव्हेटेड मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या मार्गाला जोडणाऱ्या उरण नगर परिषदेच्या हद्दीतील भूखंडावर घरे आहेत. त्यासाठी पनवेलच्या अधिकाऱ्यांकडून येथील जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणारा निधी मिळावा याकरिता शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत.
उरणच्या बाह्यवळण मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या भूखंडावर काही कुळांची घरे आहेत. यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर या मार्गाचे काम पूर्ण होईल.
समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद