

उरण : महापालिकेच्या विकास आराखड्यातील सुधारणांनुसार डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ या तीन प्रमुख पाणथळ जागा सुरक्षित राहणार आहेत. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला असून यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे.
पूर्वीच्या मसुद्यात तीन ठिकाणे निळ्या रंगात पाणथळ जागा म्हणून चिन्हांकित केली आहेत. परंतु, त्याउलट सिडकोने भविष्यातील विकासासाठी डीपीएस तलाव आणि प्रस्तावित गोल्फ कोर्ससाठी एनअ ारआय पाणथळ जागा म्हणून चिन्हांकित केले आहे. सिडकोने टीएस चाणक्य पाणथळ जागा निवासी क्षेत्र म्हणून दर्शविली आहे. राज्य नगरविकास विभागाने जारी केलेल्या प्रस्तावित सुधारणांवरील अधिसूचनेनुसार, याबाबत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या असून २३ ऑगस्टपर्यंत त्या सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेने स्वतःच पाणथळ जागा, फ्लेमिंगो निवासस्थाने आणि इको टुरिझम स्थळे म्हणून राखण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु सिडकोने या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही. विकास आराखड्यानुसार, एनअ- ारआय पाणथळ जागेला लागून असलेल्या सेक्टर ६० येथील सुरू असलेला रिअल इस्टेट विकास, मसुदा डीपीमधील सुधारणांनुसार निवासी क्षेत्र म्हणून कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१८ मध्ये निवासी-व्यावसायिक प्रकल्प आणि गोल्फ कोर्स रद्द केला होता, परंतु सिडकोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून येथे या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे.
'नॅटकनेक्ट फाउंडेशन'ने सुधारणांचे स्वागत करताना, प्रमुख पाणथळ जागांचा 'पाणथळ जागा' हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि सरकारकडून अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी सूचना एकत्रित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. राज्य सरकारने डीपीएस फ्लेमिंगो तलावाला आधीच संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहे. आत्ता सर्वांना या संदर्भातील राजपत्रित आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यातच विकास आराखड्यात या जागा संरक्षित असल्याने पर्यावरणप्रेमींना आनंद झाला आहे.