

राजकुमार भगत
उरण: मुंबई आणि नवी मुंबई परिसरात ज्या कचरा आणि डेब्रीज (बांधकाम ढिगारा) टाकण्यावर प्रशासनाने सक्त बंदी घातली आहे, तोच घातक आणि विषारी कचरा आता उरण तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्रासपणे डम्प केला जात आहे.
उरणमधील विस्तीर्ण खाजण जमिनी, शेती आणि सखल भागांवर अहोरात्र बेकायदेशीर भराव सुरू असून, यामुळे येत्या पावसाळ्यात उरण तालुक्याला भयंकर पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कृत्याला स्थानिक महसूल आणि शासकीय यंत्रणेचा छुपा वरदहस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
उरणच्या ग्रामीण भागात सुरू असलेला हा भराव आता इतक्या टोकाला गेला आहे की, या डेब्रीजच्या टेकड्यांची उंची चक्क शेजारील गावांपेक्षा आणि मानवी वस्त्यांपेक्षाही जास्त झाली आहे.
निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून झालेल्या या उंच भरावामुळे आजूबाजूची गावे जणू काही खोल दरीत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडेल, तेव्हा डोंगरासारख्या उंच झालेल्या या भरावावरून सर्व पाणी थेट सखल भागात असलेल्या गावांमध्ये आणि लोकांच्या घरांमध्ये शिरणार हे आता स्पष्ट दिसत आहे.
भूमाफियांनी स्वतःच्या फायद्यासाठी उरणमधील भौगोलिक रचनेचा पूर्णपणे चक्काचूर केला आहे. भराव करताना, पारंपारिक आणि नैसर्गिक नाले पूर्णपणे माती आणि डेब्रीज टाकून बुजवण्यात आले आहेत. पाण्याच्या नैसर्गिक वहिवाटी कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होणारे सर्व जुने मार्ग बंद झाल्यामुळे, पावसाळ्यात पाण्याचा साचलेला साठा बाहेर पडायला जागाच उरलेली नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात उरण तालुका जलमय होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रात डेब्रीज आणि रासायनिक कचरा टाकण्यास कडक प्रतिबंध केले आहेत. तिथे हा कचरा पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानला जातो.
मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे, उरण तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करताच हाच कचरा आणि डेब्रीज जणू काही उपयुक्त ठरत असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. इतर शहरांचे डम्पिंग ग्राउंड बनत चाललेल्या उरणकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संताप जनतेमध्ये आहे.
भूमाफियांनी नैसर्गिक नाले बुजवून गावांपेक्षा उंच भराव केले आहेत. यामुळे पाणी जाण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. जर या बेकायदेशीर भरावावर तत्काळ कारवाई झाली नाही, तर यावर्षीच्या पावसाळ्यात उरण तालुक्यात अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण होईल. याला सर्वस्वी स्थानिक प्रशासन आणि महसूल विभाग जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.