

महाड : श्रीकृष्ण बाळ
चालू वर्षी होत असलेला असामान्य पाऊस हा झेड प्रवाहातील बदलाचा परिणाम असल्याचे मत महाड येथील जेष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर समीर बुटाला यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.
चालू वर्षी पोलादपूर तालुक्यात 4000 पेक्षा जास्त तर महाडमध्ये कालच तीन हजार मिलिमीटर चा टप्पा पावसाने पूर्ण केला असून या सदर्भात त्यांच्याशी भेट घेऊन या बदलत्या हवामानामुळे होणारा अतिरिक्त पावसा संदर्भात शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेतला असता डॉक्टर समीर बुटाला यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी ठराविक सरासरी पावसाचे प्रमाण भारतात पडत असते. परंतु या वर्षीचा पाऊस नेहमीच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात आणि असामान्य स्वरूपाचा असल्याचे सर्वसामान्यांना जाणवत आहे.
मे महिन्यातच पावसाची सुरुवात होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत तो खंड न पडता सुरू आहे. पश्चिम किनार्याबरोबरच मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच उत्तर भारतातही हा पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. त्यामुळे ज्या भागात पाण्याचा नेहमी तुटवडा असतो, तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या असामान्य पावसामागील काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगभर तापमान सतत वाढत आहे. औद्योगिकीकरण, कार्बन डायऑक्साइड व इतर हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणातील उष्णता साठवली जाते. या प्रक्रियेमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानही वाढते. उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त होते. ही आर्द्रता ढग निर्माण करून पावसाची तीव्रता वाढवते. त्यामुळे काही भागात पूर तर काही भागात दुष्काळ अशी टोकाची परिस्थिती दिसून येते.
प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात समुद्रपृष्ठाचे तापमान असामान्यरीत्या वाढते. त्यामुळे भारतातील मान्सून पावसाचे प्रमाण कमी होते. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागात समुद्रपृष्ठाचे तापमान असामान्यरीत्या कमी होते. त्यामुळे भारतात जास्त पाऊस पडतो.
या दोन्ही प्रक्रियांमुळे मान्सूनची तीव्रता, कालावधी आणि वितरण यामध्ये मोठे चढउतार दिसतात. या वर्षी ला नीना सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाऊस नेहमीपेक्षा जास्त पडला. मान्सून काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे हवेचे दाबकेंद्र बदलते. जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा त्या भागात वारे आत खेचले जातात आणि ढगांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळे व दाबकेंद्र महाराष्ट्राच्या किनारपट्टी व मध्यभागी पाऊस आणतात.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे पूर्व भारत, मध्य भारत व उत्तर भारतात पाऊस पाडतात. या वर्षी या दाबकेंद्रांची संख्या व तीव्रता दोन्ही जास्त होती. अतिरिक्त पाऊस होण्याचेमहत्वाचे कारण म्हणजे जेट प्रवाहातील बदल होय (गशीं डीींशरा डहळषीीं) असे स्पष्ट करताना डॉक्टर समीर बुटाला यांनी सांगितले की,जेट प्रवाह म्हणजे वातावरणाच्या उंच थरांमध्ये (10-15 कि.मी.) वाहणारे तीव्र गतीचे वारे. हे वारे मान्सून पावसाचे दिशा व कालावधी ठरवतात.
साधारणपणे मान्सून हंगामात जेट प्रवाह उत्तर दिशेला सरकतात, त्यामुळे पाऊस कमी होऊ लागतो. पण या वर्षी ते दक्षिणेकडे जास्त काळ टिकून राहिल्यामुळे पावसाचा कालावधी वाढला. परिणामी सप्टेंबर महिन्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.
या वर्षीच्या पावसाची तीव्रता आणि कालावधी हे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, तसेच महासागरातील दाबातील असामान्य बदल यांचे परिणाम आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, सांगलीसारख्या ठिकाणीही पूरस्थिती निर्माण झाली, तर उत्तराखंड, उत्तरप्रदेशात ढगफुटी व भूस्खलनाच्या समस्या उभ्या राहिल्या.