

पनवेल : अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब झाला आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना कायम सामोरे जावू लागू नये, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी 8 कोटी 81 लाख 35 हजार 631 इतक्या रकमेची ई-निविदा प्रसिद्ध होऊन बराच कालावधी होऊन सुद्धा अद्यापही धरणातील गाळ काढण्यासाठी विलंब होत असल्याचे मे 2025 मध्ये निदर्शनास आले आहे.
या धरणाचा गाळ काढल्यास जवळपास 46 गावे व 33 आदिवासी वाडयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे धरणातील गाळ काढण्यासाठी तीन वेळा निविदा व सूचना प्रसिद्ध करूनही धरणाचा गाळ काढण्यास विलंब होत असल्यामुळे गावांना व आदिवासी वाडयांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून 46 गावे व 33 आदिवासी वाडयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, उमटे धरणातील गाळ काढण्यास विलंब होत असल्याची बाब खरी असून सदर कामासाठी तीन वेळा निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि, त्यास प्रतिसाद प्राप्त झाला नाही. सदर कामाकरीता पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू आहे.
उमटे धरण हे उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव आहे. उमटे धरणातील गाळ काढल्यानंतर उमटे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावे, वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सदर कामाची निविदा तीन वेळा प्रसिध्द करण्यात आली होती, त्यास प्रतिसाद प्राप्त झाला नाही. पुन्हा चौथ्यांदा निविदा प्रसिध्द करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू आहे. तसेच उमटे धरणातून सदर गावांना व वाड्यांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे, अशीही माहिती नामदार गुलाबराव पाटील यांनी दिूली आहे.
उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी 8 कोटी 81 लाख 35 हजार 631 इतक्या रकमेची ई-निविदा प्रसिद्ध होऊन बराच कालावधी होऊन सुद्धा अद्यापही धरणातील गाळ काढण्यासाठी विलंब होत असल्याचे मे 2025 मध्ये निदर्शनास आले.