

पोलादपूर : हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत आपल्या प्राणांची आहुती देणारे, पराक्रम, निष्ठा आणि बलिदान यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमरठ येथील ऐतिहासिक समाधीस्थळी ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने भव्य मशालमहोत्सव अत्यंत भक्तिभावात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याने संपूर्ण परिसर उजळून निघत शिवमय झाला होता.
रात्रीच्या अंधारात पेटलेल्या असंख्य मशालींनी जणू इतिहासालाच उजाळा दिला. समाधी परिसर भगव्या ध्वजांनी सजवण्यात आला होता. मशालींच्या प्रकाशात उजळून निघालेली नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी पाहून उपस्थित शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजन, अभिषेक, आरती व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवकालीन परंपरेनुसार मशाल प्रज्वलन करण्यात आले. पारंपरिक शिवकालीन वेशभूषेत सजलेले युवक, विद्यार्थी आणि शिवभक्तांनी हातात मशाली घेऊन समाधी परिसरात मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत स्वराज्याचा इतिहास, कोंढाण्याच्या लढाईतील अद्वितीय पराक्रम आणि तानाजी मालुसरे यांचे बलिदान जिवंत झाले.यावेळी वक्त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी त्यांनी केलेला अतुलनीय पराक्रम, कोंढाणा जिंकण्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही इतिहासातील अजरामर ओळ पुन्हा एकदा उपस्थितांच्या मनात कोरली गेली. तानाजी मालुसरे यांचे शौर्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठी ते दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या मशाल महोत्सवात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. इतिहासाची जाण ठेवून समाजासाठी, राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा या सोहळ्यातून मिळते, अशी भावना अनेक युवकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्ष इतिहासाचा अनुभव ठरला.
कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने, शांततेत व शिस्तीत हा सोहळा पार पडला. कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मशाल महोत्सव यशस्वी करण्यात आला.
ढोल-ताशांचा निनाद, मशालींचा प्रकाश, भगवे ध्वज आणि शिवभक्तांचा जोश यामुळे उमरठ गाव त्या रात्री इतिहासाच्या गौरवशाली क्षणांचा साक्षीदार ठरले. शिवकालीन संस्कृती, परंपरा आणि स्वराज्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या मशाल महोत्सवातून देण्यात आला.
नरवीर तानाजी मालुसरे यांचे शौर्य, निष्ठा आणि बलिदान सदैव स्मरणात राहावे, यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या भव्य मशाल महोत्सवामुळे उमरठ परिसरात अभिमान, प्रेरणा आणि स्वराज्याची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित झाली.