Tuljabhavani Mata | प्रतापगडवासिनी तुळजाभवानी माता शिवप्रेमींचे श्रद्धास्थान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून झालेली देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Tuljabhavani Mata
प्रतापगडवासिनी तुळजाभवानी माता शिवप्रेमींचे श्रद्धास्थान Pudhari Photo
Published on
Updated on
पोलादपूर : समीर बुटाला

किल्ले रायगड आणि अभेद्य गड प्रतापगड हे शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत बांधले गेलेले किल्ले म्हणजे दुर्गस्थापत्याचे उत्कृष्ट नमुने. मराठी माणसाच्या मनात प्रतापगडाचे महत्त्व आगळे. कारण याच किल्ल्यावर अफझलखानाच्या रूपात आलेल्या स्वराज्यावरच्या संकटाचे महाराजांनी निराकरण केले. या प्रतापगडावरचे तुळजापूरच्या भवानीची प्रतिकृती असलेले तुळजाभवानीचे मंदिरही (Tuljabhavani Mata Temple) खुद्द महाराजांच्या देखरेखीखाली बांधले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला संपविण्याचा विडा उचलून अफझलखान विजापुराहून निघाला. त्याने मराठ्यांची आराध्य देवता असलेल्या तुळजापूरच्या भवानीची मूर्ती आणि मंदिर भग्न केले. अफझलखानाचा महाराजांनी प्रतापगडाखाली वध केला 10 नोव्हेंबर, 1659 रोजी. आणि त्यानंतर त्याच प्रतापगडावर तुळजाभवानीची प्रतिष्ठापना करून उचित न्याय केला. तेच हे तुळजाभवानीचे मंदिर. प्रतापगडावर श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे महाराजांनी ठरवले. त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे यांनी हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात जाऊन त्यांच्या सहाय्याने हिमालयातील त्रीशुलगन्डकी, श्वेतगंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामाची उत्तम शिला मिळवली.

मूर्ती घडवण्यासाठी त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून अतिशय परिश्रमपूर्वक श्री तुळजाभवानीमातेच्या मूर्तीच्या मूळ प्रतिकृती बरहुकूम विलोभनीय मूर्ती घडविली. साधारण दोन फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीच्या मस्तकावरील मुकुटावर शिवलिंग असून ही भवानी माता अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरूपात आहे. देवीच्या आठही हातांत शस्त्रे आहेत. डाव्या व उजव्या बाजूस सूर्य-चंद्र झळकत आहेत. अशी ही अतिशय प्रसन्नवदन मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली. तेथे प्रथम शिवाजी महाराजांनी तिचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रतापगडावर मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर मूर्ती प्रतापगडी पाठवण्यात आली. शिवरायांच्या आज्ञेवरून मोरोपंतांच्या हस्ते समारंभपूर्वक देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली (जुलै 1661). शिवाजी महाराजांनी देवीस नाना प्रकारचे रत्नजडित अलंकार, भूषणे वगैरे करून दिली. उदंड दानधर्म केला. महाराजांनी श्री भवानी देवीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र संस्थानच स्थापून दिले. श्री भवानी मातेची पूजाअर्चा, उत्सव, इत्यादीबद्दलची पद्धत घालून दिली. महाल, मोकासे, सनदा देऊन देवीच्या संस्थानाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी, सेवेकरी, वगैरे नेमणुका वंशपरंपरेने करून दिल्या. महाराज स्वत:ला देवीचे भोपे म्हणजे पुजारी म्हणवत. या भोपेपणाची मुतालिकी म्हणजे प्रतिनिधित्व मंबाजी नाईक पानसरे यांना देण्यात आली.

देवीच्या नित्य पूजेसाठी वेदशास्त्र संपन्न विश्वनाथभट हडप यांची नेमणूक करण्यात आली. एक नवे अधिष्ठानच प्रतापगडावर संस्थापिले गेले. महाराजांनी 8 हजार होनाचे वार्षिक उत्पन्न या संस्थानासाठी करून दिले. देवीच्या खर्चासाठी 15 गावांचा महसूल नेमून देण्यात आला. त्याचप्रमाणे पार घाटातून येणार्‍या व जाणार्‍या मालावरील जकातीपैकी दर बैलास एक रुका देवीला उत्पन्न म्हणून मिळू लागला. गडावरील देवळात दररोज त्रिकाळ चौघडा, पूजा, नैवेद्य, पुराण, पाठ, गोंधळ सुरू झाले. नवरात्राचा उत्सव थाटामाटात साजरा होऊ लागला.

चौथ्या माळेला गड जागता ठेवण्याची प्रथा

सातारा व कोल्हापूरच्या राजघराण्यांचे हे कुलदैवत आहे. नवरात्रात चौथ्या माळेला रात्री प्रतापगडावर महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो शिवप्रेमी येतात. देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेशभूषा करून हे भक्त पेटत्या मशाली घेऊन देवीची पदे म्हणत रात्रभर नाचत जागर करतात. गड जागता ठेवतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. ही प्रथा गेली 47 वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गेली तीन वर्षे गडाच्या तटबंदीवर साडेतीनशे मशाली लावून गड उजळवण्यात येतो. गडावर राहणारे उत्तेकर आणि त्यांचे सहकारी हा उपक्रम स्वखर्चाने करीत असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news