

Diwali Rush Traffic Jam
रायगड : दिवाळीच्या सुट्ट्यां आणि शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या सुरू झाल्याने मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह कोकणात आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गांवर आज (दि.१८) सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली आहे. विशेषतः मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट परिसरात वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांच्या सुमारे 7 ते 8 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील हजारो नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे केवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गच नव्हे, तर मुंबई-गोवा महामार्गावरूनही कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.
महामार्गावर पोलिसांनी अतिरिक्त पथके तैनात केली आहेत. तसेच जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली आहे, जेणेकरून लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचण येऊ नये. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील वाहनसंख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रॅफिक अपडेट्स तपासूनच मार्ग निवडावा, असा सल्लाही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.