

पोलादपूर | पुढारी वृत्तसेवा
जमाना बदल गया.. कधीकाळी रानावनातून खुडून आणलेल्या हिरव्यागार पळसाच्या पानाच्या पाणी शिंपडून ओल्या केलेल्या पत्रावळीच्या पंगती बसलेल्या दिसायच्या. त्यातील काडी तोंडात जाऊ नये म्हणून जेवण करणारा काळजी घेतच भोजनाचा आनंद लुटायचा.सोबत पळसाच्या पानांच्या द्रोणातून वाढली जाणारी आमटी,ताक पानात सांडू नये म्हणून पंगतीला बसल्यावर द्रोणाला छोटासा टेकू म्हणून दगड लावून ठेवायचा.हे दृष्ट पहात मोठ्या झालेल्या पिढीला आता मात्र जमाना बदल गया म्हणण्याची वेळ आली आहे. कारण आता पळसाच्या हिरव्यागाव पत्रावळीच गायब झाल्या आहेत. लग्न समारंभात पळसाच्या पत्रावळ्यांची जागा केव्हाच थर्माकोलने घेतली होती मात्र थर्माकोल वर बंदी आल्यानंतर मशीन द्वारे तयार होणार्या सिल्व्हर कोट पत्रावळीची चलती दिसून येत आहेत.
पूर्वीच्या काळी पळसाच्या पानांचे द्रोण व पत्रावळी हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. पळसाच्या पानांपासून बनविलेले द्रोण व पत्रवाळी, तसेच केळीचे पाने याला पूर्वी खूप महत्व होते.मात्र तंत्रज्ञान च्या युगात मशीन वर तयार होणार्या स्वतः मिळणार्या पत्रावळीना पसंती मिळू लागली आहे.
लग्न समारंभ व धार्मिक कार्यात पळसाच्या पानाच्या पत्रावळी असायच्या. मात्र अलिकडच्या काळात वृक्षतोड व हायटेक जीवन पद्धतीमुळे पळसाच्या पानांपासून बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता त्या दिसेनाशा झाल्या आहेत. दरम्यान, सध्या कागदी पानांच्या व मशीन सिल्व्हर कोटेड पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास याचा सर्रास वापर सुरु आहे. याचा वापर पर्यावरणास व मानवी आरोग्यास घातक आहे. केळीच्या, पळसाच्या पत्रावळीवर जेवण आरोग्यस हितकारक आहे, पण याचा विचार कोणीही करत नाही. झाडे जपायला हवी, पळसाच्या जेवणावळी घातल्या जात होते, हे आता फक्त सांगण्यापुरतेच राहिले आहे. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पळसाच्या पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली होती. त्यानंतरच्या काळात अंगत,पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे. सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र कोटिंग केलेल्या पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात.
पोलादपूर सारख्या ग्रामीण भागात सिल्व्हर पत्रावळी च्या जागी केळीच्या पानावर पंगत बसविण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. जनजागृती द्वारे पत्रावळीला दूर सारत आरोग्याच्या दृष्टीने पळसाची पाने किंवा केळीच्या पानांचा उपयोग करण्यात येत आहे.
महाड शहरासह तालुक्यातील काही गावात मशीनद्वारे पत्रावळी तयार करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे पेपर डिश ,सिल्व्हर कोटेड पत्रावळी तयार करण्यात येत आहे या पत्रावळी सह अनेक विक्रते थर्माकोल च्या पत्रावळी मागणी नुसार ग्राहकांना पुरवत आहेत गावागावात आजही उटणे,गोंधळाचे जेवण,विविध कार्यक्रमाचे जेवण आदींसाठी सिल्व्हर कोटेड पत्रावळी प्लास्टिक ग्लास ,चहा साठी पेपर कप ला प्राधान्य दिले जात आहे.
सन 2018 पासून शासनाने यावर बंदी घातल्यावरही पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पानांच्या पत्रावळींना चांगले दिवस येतील असे वाटू लागले होते, मात्र शासनाच्या कागदोपत्री बंदीचा यावर कोणताही परिणाम झाला नाही.