

श्रीवर्धन : कोकणातील श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्याच्या आगमनानंतर मोठ्या होड्यांवरील खोल समुद्रातील मासेमारी थांबलेली असली तरी, किनार्यावर पारंपरिक पद्धतीने ‘पेरा’ ओढून मासेमारी करण्याची रंगत वाढली आहे. समुद्र खवळलेला असताना हीच पारंपरिक ‘पेरा’ मासेमारी कोळी बांधवांसाठी जगण्याचा आधार ठरते.
पावसाळ्यात समुद्रात मोठ्या लाटा उसळतात आणि हवामान अस्थिर होते. त्यामुळे यांत्रिक नौका घेऊन खोल पाण्यात मासेमारी करणे धोकादायक बनते. अशावेळी कोळी बांधव किनार्यालगतची मासेमारीच सुरक्षित पर्याय मानतात. यासाठी आठ-दहा जणांची टीम तयार होते. मोठा जाळ समुद्रात फेकला जातो आणि नंतर शेकडो फूट लांब असलेला पेरा किनार्यावर एकत्र ओढून आणला जातो.
ही प्रक्रिया केवळ कष्टप्रद नाही तर कौशल्याची आणि एकजुटीचीही आहे. किनार्यावर पुरुष, महिला, तरुण-तरुणी सर्वजण मिळून सामूहिकरित्या काम करतात. पावसाळ्यात समुद्र खवळल्याने अनेक प्रजातीचे छोटे मासे किनार्यावर येतात. पेरा ओढताना बोईट, भादवी, रेणवी, करकटे, खेकडे अशा लहान पण अत्यंत चविष्ट मासळी मोठ्या प्रमाणात मिळते. या ताज्या मासळीला श्रीवर्धनच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
स्थानिक लोक, हॉटेल्स आणि पर्यटक खास करून पावसाळ्यात मिळणार्या या मासळीला पसंती देतात. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ पेरा ओढून मिळालेली मासळी लगेच खपते. एक स्थानिक कोळी बांधव सांगतात, पावसाळ्यात खोल समुद्रात जाणे शक्य नसते. अशावेळी पेरा ओढून थोडाफार मासा मिळतो. दिवसभराच्या श्रमाचं काहीतरी मिळतं आणि घरखर्चाला हातभार लागतो.
सध्या श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची वर्दळही वाढलेली आहे. पावसाळी वातावरण, समुद्रकिनार्यावरील गजबज, आणि स्थानिक ताज्या मासळीची चव चाखण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. परिणामी, स्थानिक कोळी बांधवांच्या उत्पन्नात थोडासा दिलासा मिळतो.
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणे हा केवळ रोजगाराचा मार्ग नाही, तर कोकणातील लोकसंस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा सामाजिक उपक्रमही आहे. पेरा ओढण्याच्या प्रक्रियेत एक प्रकारची एकजूट, श्रमसन्मान, आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते. त्यामुळे पावसाळ्यात ही पारंपरिक पद्धत केवळ मासे देत नाही, तर समाजाला एकत्र बांधून ठेवते.