Shrivardhan local news: दगडी कोळशाअभावी लोहार व्यवसायाला घरघर; श्रीवर्धन तालुक्यातील कारागिरांची संख्या घटली

महागड्या लाकडी कोळशाचा करावा लागतोय वापर
Shrivardhan local news
Shrivardhan local newsFile Photo
Published on
Updated on

भारत चोगले

श्रीवर्धन: एकेकाळी ग्रामीण जीवनाचा कणा मानला जाणारा लोहार व्यवसाय आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. श्रीवर्धन तालुक्यात पारंपरिक लोहारकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या कलेचा वारसा जपणारे मोजकेच हात आजही धगधगत्या भट्टीसमोर झगडताना दिसत आहेत.

बदलत्या काळानुसार शेती आणि बागायतीसाठी लागणारी अवजारे आता बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने पारंपरिक लोहारकामावर मोठा परिणाम झाला आहे. तरीदेखील श्रीवर्धनमध्ये काही जिद्दी कारागीर आजही आपल्या कष्टावर आणि कौशल्यावर हा व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shrivardhan local news
Central Railway Revenue: मध्य रेल्वेची वर्षभरात 79.34 दशलक्ष टन मालवाहतूक

मात्र, त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. लोहारकामासाठी अत्यावश्यक असलेला दगडी कोळसा सध्या सहज उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांना महागड्या लाकडी कोळशावर अवलंबून राहावे लागत आहे. लाकडी कोळशाचे दर गगनाला भिडल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून, ग्राहक टिकवताना कारागिरांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तालुक्यात सुमारे अठ्ठावीस लोहार कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. भट्टीतील ज्वाळांमध्ये लोखंड तापवून, भात्याने हवा देत ते लालभडक झाले की ऐरणीवर हातोडा आणि छिन्नीच्या साहाय्याने विळे, कोयते, खुरपी, नांगराचा फाळ, कुदळी, पिकाव अशी शेतीसाठी लागणारी अवजारे आणि घरगुती वस्तू अत्यंत कौशल्याने तयार केल्या जातात. ही प्रक्रिया जितकी मेहनतीची, तितकीच कौशल्यपूर्ण आहे.

परंतु, कच्च्या लोखंडाच्या वाढत्या किंमती, कोळशाचा तुटवडा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्या पिढीची या कष्टप्रद व्यवसायाकडे असलेली अनास्था या सर्व कारणांमुळे लोहार व्यवसाय डळमळीत झाला आहे. तरुण पिढी शहरांकडे वळत असल्याने पारंपरिक कौशल्य हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

यात भर म्हणजे शासनाकडून कोणतेही ठोस आर्थिक पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सबसिडी, सुलभ कर्ज योजना किंवा कच्च्या मालासाठी विशेष सवलती उपलब्ध नसल्याने भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोहार व्यवसायिकांची एकमुखी मागणी आहे की, दगडी कोळसा नियमित आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावा, तसेच शासनाने विशेष आर्थिक मदत, अनुदान आणि प्रशिक्षण योजना राबवून या पारंपरिक व्यवसायाला नवे बळ द्यावे.

Shrivardhan local news
Raigad News: जेएनपीटी-न्यू सफाळे फ्रेट कॉरिडॉरची चाचणी यशस्वी

परंपरेचा हा अंगार विझू नये, यासाठी आता तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेला लोहार व्यवसाय इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमचा लोहार व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नाही, तर पिढ्यान्‌‍पिढ्यांचा वारसा आहे. मात्र दगडी कोळशाचा तुटवडा असल्याने काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महागड्या पर्यायांमुळे खर्च वाढतो आणि व्यवसाय टिकवणे कठीण होत आहे. तरीही आम्ही जिद्दीने हा परंपरागत व्यवसाय जपतोय. शासनाने दगडी कोळसा सहज उपलब्ध करून द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत व योजनांची गरज आहे. योग्य पाठबळ मिळाले तर हा व्यवसाय नव्या उमेदीने उभा राहू शकतो.

- उमेश लोहार, व्यवसायिक, श्रीवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news