अलिबाग ः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे अंतिम चित्र सोमवारी स्पष्ट झाले. सात जागांसाठी आता एकूण 73 उमेदवार निवडणूक रिंगणात उरलेले आहे. 38 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.यामध्ये आता अलिबाग, पनवेल, उरण पेण, कर्जत या मतदार संघात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होणार असली तरी या चार मतदार संघात महाआघाडीतील घटक पक्ष असलेले शेकाप, शिवसेना, यांनी परस्परांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. तर कर्जतमध्ये अजित पवार यांच्या राष्ष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी तर अलिबागमध्ये भाजपचे दिलीप भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामुळे या लढतींबाबतही उत्सुकता निर्माण झालेली आहे. भोईर यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनी अलिबागमधून माघार घेतली असली तरी श्रीवर्धनमध्ये त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
सात जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होत आहेत.यासाठी 111 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते.यामध्ये पनवेल 23,कर्जत 13,उरण 16,पेण 15,अलिबाग 23,श्रीवर्धन 13 आणि महाडमध्ये 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.यामधून 38 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.यामध्ये पनवेल 10,कर्जत 4,उरण 2,पेण 8,अलिबाग 9,श्रीवर्धन 2, आणि महाडमधील 3 उमेदवारांनी माघार घेतली.आता सात मतदार संघात एकूण 73 जण रिंगणात उरले आहेत. यामध्ये पनवेल 13,कर्जत 9,उरण 14,पेण 7,अलिबाग 14, श्रीवर्धन 11, महाड 5 उमेदवारांचा समावेश आहे.
सहा विधानसभा मतदार संघात तिरंगी तर एका विधानसभा मतदार संघात दुरंगी लढत होणार आहे. त्याच बरोबर पेण,पनवेल आणि उरण या तीन विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एकमेका समोर ठाकले असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगडमध्ये प्रामुख्याने शिंदे शिवसेना गटातर्फे भरत गोगावले(महाड),महेंद्र दळवी (अलिबाग), महेंद्र थोरवे(कर्जत), आदिती तटकरे(श्रीवर्धन, राष्ट्रवादी अजित पवार), रवींद्र पाटील(पेण), प्रशांत ठाकूर( पनवेल), महेश बालदी (उरण) हे भाजपतर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीतर्फे स्नेहल जगताप (महाड), प्रसाद भोईर (पेण),मनोहर भोईर(उरण),नितीन सावंत ( कर्जत) हे शिवसेना ठाकरे गटातर्फे उतरले आहेत. शेकापतर्फे चित्रलेखा पाटील (अलिबाग),अतुल म्हात्रे( पेण),प्रीतम म्हात्रे( उरण),बाळाराम पाटील( पनवेल) यांनीही अर्ज दाखल केलेले आहेत. महायुतीपेक्षा महाआघाडीतच बिघाडी झाली आहे. महायुतीत अलिबागमध्ये भाजपचे दिलीप भोईर यांन तर कर्जतमध्ये अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे,येथे भाजपचे किरण ठाकरे यांनी आपला अर्ज मागे घेत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवेंना पाठिंबा दिला आहे.काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार नसला तरी अलिबागच्या राजेंद्र ठाकूर यांनी अलिबागमधून माघार घेत श्रीवर्धनमध्ये आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.