माथेरानच्या दरीत राजापूरच्या दाम्पत्याचे आढळले मृतदेह

२० वर्षापासून पुण्यात वास्तव्य, शेअरमार्केटचा करत होते व्यवसाय
Matheran
माथेरानच्या दरीत राजापूरच्या दाम्पत्याचे आढळले मृतदेहfile photo
मिलिंद कदम

माथेरान : माथेरानला भेट देण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील राजापूर येथील दाम्पत्याचा माथेरान येथे दरीत मृतदेह आढळून आला. पार्थ काशीनाथ भोगटे (वय ४६) आणि त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (४६, रा. राजापूर) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

हे दाम्पत्य गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पुणे येथे वास्तव्यास होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली होती; पण तीही मयत झाल्याने हे दोघेच पुणे येथे शेअरमार्केटचा व्यवसाय करत राहत होते. दरम्यान, ११ जुलै रोजी हे दाम्पत्य फिरण्यासाठी माथेरानला गेले होते. सायंकाळी दर्शनासाठी जात असल्याचे सांगून हे जोडपे राहण्यासाठी असलेल्या एका खासगी हॉटेलमधून निघाले होते. दुसऱ्या दिवशी हे जोडपे परतले नसल्याचे लक्षात आल्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉटस्अॅप ग्रुपवर प्रसारित केले होते. शोध घेणाऱ्या लोकांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे शेवटचे इको पॉईंटकडे जाताना दिसले आणि या जोडप्याचे शेवटचे लोकेशन दरीजवळ सापडले.

Matheran
Raigad Tourist Spots | रायगडातील पर्यटन स्थळांवर सोयीसुविधांचा अभाव

माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम तेव्हापासून या दाम्पत्याचा खोऱ्यात शोध घेत होती. १४ जुलै रोजी पार्थचा लहान भाऊ रुद्राक्ष काशिनाथ भोगटे (४३) याने माथेरान गाठून माथेरान पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. सोमवारी, बचाव पथकाला अखेर या जोडप्याचे मृतदेह लुईसा पॉइंट येथील दरीत सापडले. येथील लुईजा पॉईंट येथील ४०० ते ५०० फूट खोलदरीमध्ये हे मृतदेह असल्याने त्यांना बाहेर काढणे म्हणजे एक दिव्यच होते. परंतु माथेरान रेस्क्यू टीमच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. माथेरान पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. अधिक तपास सपोनी अनिल सोनोने, तपासिक अंमलदार गणेश गिरी, अंमलदार आर. व्ही. रामदास आदी करीत आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती देताना सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर निष्कर्ष येईपर्यंत आम्ही या दाम्पत्याच्या मृत्युबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. आधी मृतदेह तपासणी आवश्यक आहे आणि नंतर पुढील तपास केला जाईल. ही आत्महत्या आहे का आणि त्याचे संभाव्य कारण काय असावे? याचा तपास पोलीस करत आहेत. तर रायगडचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रथम दृष्टया आम्हाला आढळले आहे की, हे जोडपे शेअर मार्केटमध्ये होते आणि त्यांचे नुकसान झाले होते. पण याबाबत अजूनही सखोल तपास करण्याची गरज असून त्यानंतरच याबाबत खरी माहिती समोर येणार आहे. त्यासाठीच सखोल तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news