

माणगांव : कमलाकर होवाळ
पुणे ते माणगाव दरम्यान ताम्हिणी घाटात मध्यरात्री खाजगी प्रवासी बसला अपघात होऊन या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री पुण्याहून चिपळूणकडे निघालेल्या बस क्र. एम एच 12 व्ही एफ 9052 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला पलटली. अपघाताची माहीती मिळताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यात पुणे ताम्हिणी घाट मार्ग तसेच दिघी पोर्ट मार्ग, मुंबई गोवा महामार्ग प्रवासी दिवसेंदिवस असुरक्षित प्रवास करत आहेत. या मार्गावर विविध अपघात मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासी वर्गातून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या मार्गालगत असणारे असुरक्षित कमकुवत कठडे, रस्त्याकडेला असणार्या दरडी, अवघड वळणे, महामार्गावर असणारी अपूर्ण कामे, ताम्हिणी मार्गावर रस्त्याकडेला असणारी झाडे झुडपे, अरुंद रस्ते आणि पूल, अशा वेगवेगळ्या कारणाने अपघात वाढत आहेत. या अपघातातील जखमींमध्ये स्वस्ति गायकवाड, साची गायकवाड, स्वामिनी गायकवाड, यश यादव, दक्ष गायकवाड, विक्रम गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, भावना यादव, आदेश गायकवाड, उर्मिला गायकवाड, रजनी गायकवाड, गणेश गुंजाळ, स्मिता झोंबरे, प्रविण झोंबरे, सुजल झोंबरे, समिक्षा झोंबरे, मेघा जाधव यांचा समावेशआहे.