

कमलाकर होवाळ
माणगाव : ताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नोव्हेंबर महिन्यात याच दरीत सहा पर्यटकांचा बळी घेणाऱ्या कोंडेथर गावच्या हद्दीतील त्या अवघड उताराच्या वळणावर शुक्रवारी पुन्हा दोन भीषण अपघात झाले आहेत. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार 500 खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आजच सकाळी पुण्याहून कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला झालेल्या या अपघातातबसमधील 50 पैकी 27 प्रवासी गंभीर तर 23 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी थार जीप घाटातील याच ठिकाणी दरीत कोसळून अपघात झाल्यानंतर आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कार क्रमांक एमएच 12 वायक्यू 2234 ही 500 फूट खोल दरीत कोसळून शुभम आजबे (वय 28, रा. ब्रह्मपुरी तांबडी,सोलापूर) या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या खासगी ट्रॅव्हल्स बस वाहनाचा अपघात झाला. ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीतील अतिशय अवघड वळणावर खासगी प्रवासी बसला आजच सकाळी झालेल्या भीषण अपघातात बसमधील 50 प्रवाशांपैकी 27 गंभीर जखमी झाली असून उर्वरित 23 पर्यटक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमीत महिलांचाही समावेश आहे.श्री. दत्तकृपा ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीचीबस क्र. एमएच 14 एमटी 9394 ही खाजगी ट्रॅव्हल्स पुणे भोसरी येथून शिव महिंद्रा कंपनीचे कर्मचारी कोकणात पर्यटनासाठी जात असताना शुक्रवार सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहिती नुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेला असलेल्या कठड्याला जोरात धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताचा धक्का इतका तीव्र होता की बसमधील अनेक प्रवासी जागेवरच जखमी झाले. काही प्रवासी सीटवरून उडून पुढे आदळले, तर काहींना काचा फुटून गंभीर इजा झाली. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पुणे माणगाव मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यानच्या काळात माणगावबाजू कडून पुण्याकडे जाणाऱ्या व पुणे बाजू कडून माणगाव कडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या मोठ्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे पोलीस व माणगाव पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.