पनवेल : दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई युनिटने तळोजा, सेक्टर-23 मधील द्विशा हाईटस् या इमारतीवर छापा मारुन मागील 20 ते 25 वर्षापासून बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या 2 महिला आणि 1 पुरुष अशा 3 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. या तिन्ही बांग्लादेशी नागरिकांनी भारतील ओळखीचा पुरावा असलेले आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आहे.
तळोजा, सेक्टर-23 मधील द्विशा हाईटस् या इमारतीमध्ये काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलीस निरीक्षक तुकाराम नलवडे आणि त्यांच्या पथकाने तळोजा, सेक्टर-23 मधील द्विशा हाईटस् इमारतीतील दोन संशयित घरावर छापा मारला.
यावेळी एका घरामध्ये शोझीब बोलू शेख (37) आणि अमिना उर्फ राणी शोझीब (28) असे पती-पत्नी तर दुसर्या घरामध्ये रोवून नेकबोरे झामन मुल्ला (35) आणि रेश्मा रोवुन झामन मुल्ला (35) असे पती-पत्नी राहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘दहशतवाद विरोधी पथक’ने या चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर ‘दहशतवाद विरोधी पथक’मधील अधिकार्यांनी त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील ओळखपत्र आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले. यावेळी पोलिसांनी सदर बांग्लादेशी नागरिकांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यांच्या मोबाईल फोनमध्ये बांग्लादेशी कॉलींग कन्ट्री कोडने सुरु होणारे अनेक संपर्क नंबर आढळून आले. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये इमो नावाचे आप्लकेशन्स सुध्दा आढळून आले आहे. त्यानंतर ‘दहशतवाद विरोधी पथक’ने केलेल्या चौकशीत चौघांनी 20 ते 25 वर्षापूर्वी घुसखोरीच्या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून आणि स्थानिक मुलकी अधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय तसेच कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले.
तेव्हापासून ते भारतात राहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘दहशतवाद विरोधी पथक’ने 2 महिला आणि 1 पुरुष या तिघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) आणि विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
सदर कारवाईत ताब्यात घेण्यात आलेला चौथा बांग्लादेशी नागरिक रोवुन नेकबोरे झामन मुल्ला (35) याच्या विरोधात 2020 मध्ये मुंबईतील सहार विमानतळ पोलीस ठाण्यात पारपत्र कायदा, परदेशी नागरिक कायदा तसेच फसवणूक आणि बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे त्याच्या चौकशीत आढळून आले आहे. सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ठ असल्याने या गुह्यात आरोपी रोवुन मुल्ला याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.