

श्रीवर्धन : मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रकिनारी संशयित बोट आढळल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल होताच किनारी लगतच्या पोलीस यंत्रणेची धाकधूक वाढली असून,खबरदारी म्हणून श्रीवर्धन पोलिसांनी तातडीने बैठक घेत स्थानिक मच्छीमारांची बैठक घेत किनारपट्टीवर संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा-कोर्लाई समुद्रात एक संशयास्पद बोट आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर किनार्यालगतच्या भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे. ही बोट सुमारे तीन नॉटिकल मैल अंतरावर रडारवर दिसली असून, तिच्याविषयी विविध चर्चा सोशल मीडियावर होत आहे.प्रत्यक्षात ती बोट नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी खबरदारी म्हणून सागरी किनार्यावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथ श्रीकृष्ण मत्स्य व्यवसायिक संस्थेमध्ये मच्छिमार बांधवांसाठी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी मच्छीमार बांधवांना सागरी सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले आपण मच्छिमार आमचे कान-नाक-डोळे आहात. समुद्रात सर्वात आधी तुम्हालाच कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्ती किंवा हालचाल दिसते. त्यामुळे कोणतीही शंका आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आपल्या सतर्कतेमुळे मोठा धोका टाळता येऊ शकतो,असे आवाहन केले.
बैठकीत मोठ्या प्रमाणावर मच्छिमार बांधव उपस्थित होते. पोलिसांनी त्यांच्या शंकांचे समाधान केले आणि समुद्रातील सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली.
कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना किंवा तटरक्षक दलाला माहिती द्या, कोस्टल सिक्युरिटी हेल्पलाईन आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे क्रमांक जवळ ठेवा, पोलिस, कोस्टल पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी नियमित संपर्कात राहा, अफवा पसरवू नका, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
उत्तम रिकामे, पोलीस निरीक्षक