

कोप्रोली ःउरण नगर परिषद निवडणुकीत सातत्याने ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने त्याकडे कानाडोळा केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील 10 नंबर प्रभागातील नेहा ठाकूर या 21 वर्षीय मतदार युवतीच्या नावाने ती मतदार केंद्रात पोहोचण्या आधीच कुणीतरी तिच्या नावाने मतदान करून गेल्याची सनसनाटी घटना घडली आहे.
या युवतीने मतदान केंद्रात धिंगाणा घातल्यावर शेवटी त्या युवतीला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही त्या मुलीच्या नावाने मतदान करून गेलेली ती अन्य तरुणी कोण याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकाराबाबत मुख्य निवडणूक अधिकारी तथा उरणचे तहसिलदार उद्धव कदम यांना विचारले असता त्यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी या विषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळेच निवडणूक यंत्रणा पूर्णतः कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करीत आहे की काय असा सवाल विचारला जात आहे.
उरणच्या नगर परिषद निवडणूक ही कधी नव्हे एवढ्या हमरीतुमतीवर आली आहे. येथे अनेक आरोप प्रत्यारोप झालेले असतानाच सुमारे पाच हजार पेक्षा जास्त बोगस मतदार असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्याच बरोबर एका प्रभागाच्या मतदान केंद्रात थेट भाजपाच्या उमेदवाराने निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना मीटिंग घेतल्याची सनसनाटी घटना घडली होती.
आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी थेट दुसऱ्याच्या नावावर मतदान केले गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याबाबत घडलेली घटना अशी आहे की, नेहा मनोहर ठाकूर ही उच्च शिक्षित मतदार आज सकाळी दहा वाजताच्या सुमारात एन आय हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेली होती. ती तिथे जाऊन काही काळ रांगेत उभी राहून प्रत्यक्ष मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी ज्या क्रमांकावर तिचे नाव होते त्या नावावरील मतदान यापूर्वीच होऊन गेल्याची धक्कादायक माहिती तीला मिळाली.
या तरुणीने त्या ठिकाणी आकांडतांडव केल्यावर मग निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने एक बैठक घेऊन त्या तरुणीला शेवटी बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी देण्यात आल्याने तीने त्या प्रकारचे मतदान केले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे संबंधित तरूणीच्या नावाने ज्या कोणी मतदान करून गेली ती तरुणी मग नक्की कोण होती असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याबद्दल प्रशासनाला विचारून देखील प्रशासनाकडून केवळ तोंडावर बोट अशीच खेळी खेळली जात असल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली तर नाही ना असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.