Supermoon: यंदा वर्षाअखेर दिसणार तीनदा सुपरमून, कोणत्या तारखेला देखणा सोहळा अनुभवता येणार वाचा
रायगड : जयंत धुळप
पृथ्वीच्या आकाशात दरवर्षी काही वेळा असा क्षण येतो, जेव्हा पूर्ण चंद्र आपल्या नेहमीच्या आकारापेक्षा थोडा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसतो. या अद्भुत खगोलशास्त्रीय घटनेला 'सुपरमून' असे म्हटले जाते. या वर्षी म्हणजेच ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर अशा तीन दिवशी सुपरमूनचे चित्ताकर्शक आकर्षक दृश्य पाहण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती खगोलअभ्यासक तथा पोलादपूर येथील एस.एम महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. समीर बुटाला यांनी दिली आहे.
चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्याची कक्षा
वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे काही वेळा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळचा बिंदू असणाऱ्या 'परिजी' येथे जवळ येतो. त्या वेळी जर चंद्र पूर्ण चंद्राच्या अवस्थेत असेल, तर तो आकाशात साधारणपेक्षा ८ ते १४ टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो असे डॉ. बुटाला यांनी पूढे सांगीतले.
खगोलशास्त्रात या घटनेला 'पेरिजी-सिझीगी' असे वैज्ञानिक नाव आहे, तर सर्वसामान्यता त्यास सुपरमून म्हटले जाते. या वर्षी ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर २०२५च्या तीनही रात्री आकाश स्वच्छ असेल तर पूर्ण चंद्र अधिक मोठा, उजळ आणि मनमोहक स्वरूपात झळकताना दिसेल.
खगोलप्रेमी आणि आकाशा निरीक्षकांसाठी हा काळ म्हणजे एक आनंदाचा उत्सव ठरणार आहे. अशा वेळी दुर्बिणी किंवा कॅमेऱ्याच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे (क्रेटर्स) आणि रेषा (मारीआ) अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. त्यामुळे येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत सुपरमूनचा हा जादुई प्रकाशोत्सव निसर्गाचा अनोखा चमत्कार ठरणार असल्याने खगोलअभ्यासक रात्रीच्या आकाशात नजर लावून राहाणार आहेत.
