

माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीएसआर अंतर्गत सोलार हायमास्ट व सोलार पथदिवे बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
मी माणगावकरांना जो शब्द देतो, तो मी पूर्ण करतो. माणगाव शहर हे नजीकच्या काळात दक्षिण रायगडातील विकासाचं मॉडेल ठरेल. असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त करीत माणगावचे नाट्यगृह, बायपास, यासह अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगत 2 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माणगाव मध्ये येणार असून ते अधिक विकासाच्या मुद्द्याला चालना देतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, आनंद यादव, सुभाष केकाणे, शादाबभाई गैबी, शेखरशेठ देशमुख, मुख्याधिकारी संतोष माळी, तहसीलदार दशरथ काळे, नगरपंचायतीचे नगरसेवक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरी जीवन उजळवण्यासाठी गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माणगावात विविध ठिकाणी सौर पथदिवे आणि हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला.
खासदार तटकरे यांनी सौर ऊर्जा हा पर्यावरण स्नेही पर्याय आहे. अशा योजनांमुळे ग्रामीण व अर्धशहरी भागात स्वच्छ व स्वयंपूर्ण ऊर्जेची वाट निर्माण होते. या कार्यक्रमास माणगाव नगरपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम माणगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
या उपक्रमासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत माणगाव शहरात 144 सौर पथदिवे आणि 20 सौर हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील अंधारयुक्त रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणे प्रकाशमान होणार असून, नागरीकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. विशेषतः महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौरऊर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन ऊर्जा साधनांचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.