Maharashtra politics : खा. सुनील तटकरेंच्या खेळीने विरोधक हादरले !

शिवसेना प्रवक्ते अॅड. राजीव साबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने माणगावातील राजकीय समीकरणे बदलणार
Sunil Tatkare political strategy
खा. सुनील तटकरेंच्या खेळीने विरोधक हादरले !pudhari photo
Published on
Updated on

माणगाव : कमलाकर होवाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीने विरोधक पुरते हादरले आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते अॅड, राजीव साबळे यांना विकासाच्या मुद्यावर आपल्या पक्षात घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे केवळ माणगाव तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत.

राजीव साबळे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याने सुरवातीला बहुतेक सर्व शिवसेनेचे नगरसेवक आणि नगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने माणगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे.

याच माणगाव तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी, विविध समाजसेवी संघटना, पतसंस्थांचे पदाधिकारी, सामाजिक मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते असे हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

माणगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. भविष्यात माणगाव हे जिल्ह्याची राजधानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणगाव शहराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे माणगाव शहराला भौतिक आणि पायाभूत सुविधांसह शाश्वत विकास जलदगतीने होण्यासाठी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो हा आत्मविश्वास वाटत असल्याने राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

हा पक्ष प्रवेश सो हळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता माणगावच्या निजामपूर रोड येथील सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या भव्य प्रांगणात होणार आहे.

अॅड. राजीव साबळे हे राजकारणात अजातशत्रू म्हणून रायगड जिल्ह्यात ओळखले जातात. ते चार वेळा रायगड जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. त्यांचे पिताश्री अशोक दादा साबळे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे ३३ वर्षे अध्यक्ष असून ७ कॉलेज आणि ४ शाळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष असून पतसंस्थेच्या आठ शाखा आहेत.

सह्याद्री बाजारचे ते विद्यमान चेअरमन आहेत. तसेच अशोक दादा साबळे पतसंस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचे विविध पक्षातील नेत्यांशी जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. तसेच माणगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद राजीव साबळे यांच्याकडे आहे असा आत्मविश्वास खासदार सुनील तटकरे यांना वाटत असल्याने त्यांनी राजीव साबळे यांना पक्षात घेण्याचे ठरविले आहे. लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात राजीव साबळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाचही विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळू शकते.

मागील निवडणुकीत राजीव साबळे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघात शिवसेनेला अनपेक्षित यश मिळवून दिले होते. परंतु या कामगिरीची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी साधी दखल घेतली नाही यांची खंत वाटत होती. त्यानंतर माणगाव नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ९ नगरसेवक निवडून आणून माणगावच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा माणगावच्या नगरपंचायतीवर फडकला. यांचे सारे श्रेय आणि योगदान शिवसेना नेते राजीव साबळे यांचे होते. या ऐतिहासिक कामगिरीचीही दखल पक्ष नेतृत्वाने घेतली नाही. त्यांना तोपर्यंत कोणतेही पद किंवा पक्षाची जबाबदारी दिली गेली नाही. त्यावेळी निवडणुकीत खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांनी प्रचार करुन सुद्धा त्यांना पराभवाचा धक्का राजीव साबळे यांनी दिला होता. हा पराभव तटकरे यांच्या जिव्हारी लागला होता.

हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. एवढा विजय मिळवूनही पक्षाने राजीव साबळे यांना बाजूला ठेवून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचे राजकीय षडयंत्र सुरू ठेवले होते. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळवून शिवसेनेचे सरपंच निवडून आणण्यात राजीव साबळे यांचा सिंहाचा मोठा वाटा होता हे पक्षनेतृत्व विसरले.

शेवटी सहा महिन्यांपूर्वी राजीव साबळे यांना शिवसेनेने राज्य प्रवक्ते केले. परंतु त्यांना कोणतेही काम दिले नाही किंवा जबाबदारी दिली गेली नाही. ते पद हे शोभेचे पद ठरले. असे असले तरी माणगाव शहरात विकास कामे व्हावीत यासाठी प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने दुर्लक्ष करून माणगाव करांची दिशाभूल करण्यात आली. माणगावात विकास कामे व्हावीत यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागले तरीही कामे झाली नाहीत. त्यामुळे भ्रमनिरास झाला. शहरात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. या घडामोडीत खासदार सुनील तटकरे यांनी बीएससी नर्सिंग कॉलेजला मान्यताच मिळवून दिली नाही तर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • भादाव पूल, माणगाव विकास आराखडा, काळ नदी पात्रात बंधारा, नाना-नानी पार्क, भुयारी गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया व्यवसथापन प्रकल्प, कचरा खत निर्मिती प्रकल्प, अंतर्गत रस्ते आणि गटारे, रस्ते रुंदीकरण, बायपास अशी विविध विकास कामे करण्यासाठी खासदार सुनील तटकरे हे राजीव साबळे यांनी केलेल्या मागणीनुसार प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे. विशेष म्हणजे अॅड. राजीव साबळे यांना आमदार करावे अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह संचारला आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या या राजकीय खेळीने विर-ोधक मात्र हादरुन गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात देखील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news