

ठळक मुद्दे
फळबाग लागवडीसाठी देण्यात आलेली जमीन अभिनेत्री सुहाना शाहरूख खान हिला विकली
2023 नंतर जमिनीची दोन वर्षानंतर आता चौकशी सुरू
सुहाना खान हीने खरेदी केलेली जमीन वादात सापडली
Suhana Khan Alibaug Land purchase Case
रायगड : अलिबाग तालुक्यातील थळ येथील ना विक्री कलमाअंतर्गत लागवडीसाठी दिलेली जमीन परस्पर विकल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. फळबाग लागवडीसाठी देण्यात आलेली ही जमीन अभिनेत्री सुहाना शाहरूख खान हिला विकण्यात आल्याने, या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२३ मध्ये नोंदणीकृत साठे कराराच्याव्दारे विक्री झालेल्या या जमिनीची दोन वर्षानंतर आता चौकशी सुरू केली आहे. अलिबाग तहसिलदारांना याबाबतचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
दक्षिण मुंबईला सागरी मार्गान थेट जोडले गेल्याने, अलिबागमधील जागा जमिनींना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. अनेक देशभरातील नामांकीतांनी अलिबाग मध्ये जागा जमिनींची खरेदी सुरू केली आहे. यात तारे तारकांचाही समावेश आहे. अभिनेता शाहरूख खान, जुही चावला, विराट कोहली, रोहित शर्मा, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, राम कपूर, अक्षय खन्ना, क्रिती सेनॉन यांच्या पाठोपाठ अभिनेत्री सुहाना शाहरुख खान हिने देखील अलिबाग तालुक्यातील थळ येथील जागा खरेदी केली होती.
परवानगी शिवाय साठेकरार
मात्र आता सुहाना खान हीने खरेदी केलेली जमीन वादात सापडली आहे. कारण १९६८ साली थळ येथील येथील सर्वे नंबर ३४५/२ मधील ०.६०.७० हेक्टर जमिन लागवड आणि वापरासाठी नारायण विश्वनाथ खोटे यांना शासनाकडून देण्यात आली होती. ही जमीन देतांना ही जमीन जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय गहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती. मात्र नारायण खोटे यांच्या वारसांनी ही जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच परस्पर अभिनेत्री सुहाना खान हिला नोंदणीकृत साठे कराराव्दारे १२ कोटी ९१ लाख रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. या विक्री व्यवहारावर अलिबागधील ॲड. विवेक ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय हा साठेकरार झाला असल्याने, हा व्यवहार रद्द करावा, संबंधितांवर कारवाई करावी आणि सदर जमीन अटी व शर्ती यांचा भंग केल्याने शासन जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन वर्षांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अलिबागच्या तहसिलदारांना या प्रकरणी दोन दिवसात वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी जारी केले आहेत. त्यामुळे तहसिलदारांच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अलिबाग तालुक्यात सिनेकलाकारांसह उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून शेत-घरांचे बांधकाम केले आहे. अशी बांधकाम शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून केले जाते असा आरोप होत आला आहे. त्यावर महसूल विभाग कारवाई करीत असले तरी जमिन विक्री प्रकरणातील गैरप्रकार समोर येत आहेत.
तहसिलदारांच्या अहवालाकडे लक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन वर्षांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अलिबागच्या तहसिलदारांना या प्रकरणी दोन दिवसात वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी जारी केले आहेत. त्यामुळे तहसिलदारांच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.