

सुधागड : सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये रात्री पावणे दोन ते पहाटे सव्वा तीन वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने फिल्मी स्टाईलने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. मात्र आठवडा उलटून गेला तरी हे दरोडेखोर अजूनही मोकाटच आहेत. येथील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये 5 संशयित दिसले आहेत. मात्र अजूनही हे संशयित पोलिसांना सापडलेले नाहीत.
झूकेगा नही साला अशी डायलॉग बाजी करत व शस्त्रास्त्र दाखवत या दरोडेखोरांनी लोकांना दहशत दाखवली. यावेळी सर्व घरांतील मिळुन एक लाख रुपयांचे सोने व जवळपास 60 हजार रुपयांची रोकड व मोबाईल लुटून हे दरोडेखोर पसार झाले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे.
गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. या टोळीने कोयता व तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने, रोकड असा मौल्यवान ऐवज लंपास केला.
पोलिसांचा तपास धिम्यागतीने घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवतारे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीम, दंगल नियंत्रक पथक यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र अजूनही पोलिसांना ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. येथील एका फार्म हाऊसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये पाच संशयित लोक कैद झाले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मात्र कॅमेर्यात कैद झालेले हे लोक नक्की कोणत्या बाजूला गेले हे मात्र पोलिसांना कळलेले नाही.
या सशस्त्र दरोड्यांनी तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे. रात्रीच्या अंधारात कोयता आणि तलवार घेऊन दरोडेखोर घुसले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही, परंतु गावकर्यांचा सुरक्षिततेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. कासारवाडी गावामध्ये रात्री काही अज्ञात लोक घुसले होते.
या घटनेनंतर गावकर्यांनी पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाई आणि गावात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. आमच्या गावात रात्री पोलिस गस्त नाही. जर नियमित गस्त असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती, असे माठळ गावातील रहिवाश्यांनी सांगितले. गावकर्यांनी स्थानिक प्रशासनाला गावातील सुरक्षाव्यवस्था सुधारण्याची विनंती केली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान घटनास्थळाच्या नजीकच्या परिसरातील एका फार्म हाऊस मधील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता 5 संशयित अनोळखी इसम चालत जात असल्याचे दिसत आहेत. तरी सदर व्हिडीओ मधील अनोळखी इसमां बाबत कोणाला काहीएक माहिती असल्यास, कोणी त्या इसमाना आपले वाहनातून लिफ्ट दिली असल्यास माहिती कळवावी. तसेच कोणत्याही पोलीस ठाणे हद्दीत त्यांच्या विरुद्ध गुह्याची नोंद असल्यास माहिती कळवावी. असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. श्रविंद्र दौंडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा विभाग रोहा, 9821662649 हेमलता शेरेकर, पोलीस निरीक्षक पाली पोलीस ठाणे, 8793919939 मिलिंद खोपडे, पोलीस निरीक्षक, ङउइ 9923734923
पोलिसांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेल्या संशयीतांची कोणाला माहिती असेल तर ताबडतोब त्यांनी पोलिसांना कळवावे. सुधागड तालुक्यात व पाली शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्याची संख्या कमी आहे. त्यामुळे दरोडेखोर नक्की कोणत्या बाजूला गेले आहेत हे समजेलेले नाही. आपल्या आजूबाजूला अशाप्रकारे कोणी संशयात बस व्यक्ति घेतल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे.
हेमलता शेरेकर, पोलीस निरीक्षक, पाली पोलीस ठाणे