नेवाळी : ऐन पावसात गटाराचे पाणी थेट शाळेमध्ये घुसत असल्याने या पाण्यातच बसून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
अंबरनाथ डोंबिवली महामार्गालगत असलेल्या नेवाळीतील विद्यालयात पावसाचे पाणी प्रवेश करत आहे. गटारांची कामे ठेकेदाराकडून केली न गेल्याने त्याचा फटका हा आजूबाजूच्या रहिवासी वर्गाला देखील बसू लागला आहे.
बुधवारी महाविद्यालयातील विद्यार्थी साचलेल्या पाण्यात धडे गिरवत असतानाच पालकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून देखील प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेवाळीत हे विद्यालय आहे.
परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. याचा फटका दुपारच्या सत्रात शिकणार्या लहान मुलांनाही बसू लागला आहे. अंबरनाथ-डोंबिवली महामार्गावरील गटारांची कामे पूर्ण न झाल्याने मागील दोन वर्षांपासून या महाविद्यालयाला नाल्यातील दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात नुकतीच नेवाळी ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय अधिकार्यांची भेट घेत परिसरातील वास्तव त्यांच्यासमोर मांडले होते. मात्र त्यानंतर देखील दखल घेतली गेली नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
बुधवारी नाल्यातील पाण्यात शिक्षण घेतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने महाविद्यालय अन्यत्र स्थलांतराचा विचार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा मनस्ताप विद्यार्थ्यांनी सहन का करावा, असा प्रश्न देखील पडला आहे.