पनवेल : पुढारी वार्ताहर : पनवेल येथील ओवळा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीदरम्यान मंगळवारी तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. दहशत निर्माण करणार्या या दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी तक्रार न आल्याने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
महाशिवरात्री उत्सवा आणि सिद्धेश नंदराजशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 12) आमदार हिंद केसरी पनवेल उरण व सरपंच हिंद केसरी ओवळे या बैलगाड्याच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील ओवळे येथील गावदेवी मैदानात रंगलेल्या या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या छकडा स्पर्धेत पनवेल, नवी मुबई, ठाणे, रायगड तसेच अन्य भागातील बैलजोडी मालकांनी सहभाग घेतला होता. यात ठाण्याचे प्रसिद्ध बैलजोडी मालक राहुल पाटील यांच्या माथूर या बैलजोडीचाही समावेश होता. अंतिम सामन्यात माथूर बैलजोडीचा पनवेलमधील जयेश पाटील यांच्या बैल जोडीने पराभव केला. यानंतर उपस्थित गर्दीने जल्लोष सुरू केला.
याच दरम्यान विजेत्या व पराभूतांच्या गटात बाचाबाची सुरू झाली. काही वेळेतच या बाचाबाचीचे रूपांतर दगडफेकीत झाले. ही दगडफेक पंधरा ते वीस मिनिटे सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडली तेव्हा पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांना काहीही करता आले नाही. दरम्यान, या घटनेनंतर तक्रार न आल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.