

जेएनपीए : विठ्ठल ममताबादे
जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. नविन वर्षांपासून बंदरातून मुंबईत प्रवाशांना घेऊन जाण्या येण्यासाठी अद्यावत स्पीड बोटी धावणार आहेत. या प्रदूषण विरहीत रहित स्पीडबोटीमुळे 35-40 मिनिटांत प्रवाशांना जेएनपीए-मुंबई दरम्यान पोहचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरुन प्रवास करणार्या सर्वांनाच होणार आहे.
जेएनपीए बंदरातून मुंबईत येण्याजाण्यासाठी याआधी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. ही सागरी व्यवस्था जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी उपयुक्त ठरत होती. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या सागरी मार्गावरुन लाकडी बोटी सोळा राऊंड ट्रीप प्रवासी वाहतूक करीत होत्या. यासाठी जेएनपीए दरमहा 19 लाख 68 हजार खर्च करीत आहे. दरम्यानच्या काळात उरण पर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी अटल सेतूही खुला झाला आहे. यामुळे या जेएनपीए- गेटवे (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे. त्यानंतर जेएनपीएनेही बोटींची संख्या कमी करुन आता मागील काही महिन्यांपासून आठपर्यंत आणून सोडली आहे. मात्र त्यानंतरही प्रवासी संख्या घसरणीलाच लागली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने व लाकडी बोटी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनही उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अंतर्मुख होऊन जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदुषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटर्यांवर चालणार्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे.
जेएनपीएने इलेक्ट्रॉनिक बॅटर्यांवर चालणार्या प्रदुषण विरहीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या दोन फायबरच्या हलक्या स्पीडबोटी 10 वर्षाच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने या प्रस्तावाला प्रतिसाद देऊन दोन स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10-12 क्षमतेच्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी नवीन वर्षाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच प्रवासी वाहतूकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार आहेत.'
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्पीडबोटींमुळे जेएनपीए- मुंबई दरम्यानचा सागरी प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांत शक्य होणार आहे. जेएनपीएने 10 वर्षाच्या या दोन स्पीड बोटींच्या 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजूरी दिली आहे.अशी माहिती जेएनपीएचे उप संरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.
प्रदूषण विरहीत, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षाभरापुर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अंमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
- बाळासाहेब पवार, उप संरक्षक कॅप्टन, जेएनपीए