

रायगड ःगणेशोत्सवाची धामधूम जोरात सुरू झालेली आहे.लाखो गणेशभक्त गावोगावी जात आहेत.त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगडातील सरकारी यंत्रणा परस्परांशी समन्वय राखत सहकार्य करत असल्याचे जाणवत आहे.यामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे विघ्न न येता सवार्र्ंचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडत आहे.दरम्यान,महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रायगड पोलिसांनी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
जिल्ह्यात 287 सार्वजनिक तर 1 लाख 2 हजार 198 खाजगी गणपती आहेत. उत्सवासाठी गावी परतणार्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असून पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे.
पोलिसांचे जागते रहो
गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, 10 सुविधा केंन्द्र, 10 क्रेन, 10 अॅम्ब्युलन्स, 7 उपविभागीय पोलिस अधिकारी, 12 पोलिस निरीक्षक, 43 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 276 पोलिस कर्मचारी व होमगार्ड 100 नेमण्यात आले आहेत. यासह खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा तैनात करण्यात आलेली आहेत.
कोकणवासियांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी आधुनिकेतचा आधार घेतला आहे. वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात खारपाडा आणि पाली या ठिकाणी दोन एआय सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेरांच्या मदतीने वाहनांच्या संख्येवर लक्ष ठेवून वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
अभिजीत भुजबळ,वाहतूक पोलीस निरीक्षक