

श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र असले तरी, येथे सुरू असलेला ढिसाळ कारभार व कर्मचार्यांची टंचाई यामुळे रुग्णसेवा बिघडल्याचे चित्र समोर येत आहे. अत्यावश्यक सेवा देणारे हे रुग्णालय आज रुग्णांना वेळेवर उपचार न देता, उलट कागदी प्रक्रियेमुळेच त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सध्या तालुक्यात वायरल ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. गौरी-गणपती सणासाठी आलेले अनेक कोकणवासी देखील या आजारांना बळी पडले आहेत. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालय हीच आधाराची जागा असली तरी, येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना किमान अर्धा ते पाऊण तास केवळ केस पेपर व औपचारिकता पूर्ण करण्यात खर्च करावा लागतो. ऑनलाईन सिस्टीम वारंवार बंद पडणे हीसुद्धा गंभीर समस्या ठरत आहे.
रुग्णालयात विविध आजारांसाठी डॉक्टर नेमलेले असले तरी, अनेक वेळा ते ड्युटीच्या वेळेस हजर नसल्याचे दिसून आले आहे. रविवारी दुपारी एका तापाच्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असता, उपस्थित परिचारिकेने फक्त गोळ्या देऊन उद्या सकाळी या असे सांगितले. या वेळी कोणताही डॉक्टर हजर नसल्याचे उघड झाले. तातडीच्या उपचाराऐवजी उदासीनता दाखवल्याने नागरिकांचा रुग्णालयावरचा विश्वास कमी होत आहे.
रुग्णसंख्या वाढत असताना रक्त तपासणीसाठी केवळ सकाळी दहा ते दुपारी बारा या दोनच तासांतच नमुने घेतले जातात. त्यानंतर आलेल्या रुग्णांना खाजगी लॅबमध्ये जावे लागते किंवा दुसर्या दिवशी प्रतीक्षा करावी लागते. इतकेच नव्हे तर सॅम्पल घेणार्या कर्मचार्यांची संख्या देखील अपुरी आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे इमारत व सुविधा आधुनिक असूनही, ढिसाळ कारभार आणि कर्मचार्यांची कमतरता यामुळे येथे उपचार सेवा कोलमडल्या आहेत. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी आमदार तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष घालावे व रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी केली आहे.
स्ट्रेचर बॉयच्या अभावामुळे नातेवाईकांची फरफट
रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत वाईट असून, बेडशीट देखील अनेकदा अस्वच्छ असल्याच्या तक्रारी आहेत. बेडवर चादर घालण्यासाठीही नातेवाईकांनाच जबाबदारी सोपवली जाते. स्ट्रेचर बॉय कमी असल्याने रुग्णांना मजल्यावर नेतानाही नातेवाईकांनाच धावपळ करावी लागते. प्रत्येक रुग्णासोबत एक नातेवाईक असतो, परंतु त्याच्यासाठी बसण्याची कुठलीही सोय रुग्णालयात उपलब्ध नाही. प्रशासनाने केलेले हे दुर्लक्ष अत्यंत गंभीर मानले जात आहे.
ऑनलाईन रुग्णांची नोंद पूर्वी उशीराने होत असली, तरी आता आधारकार्डाची नोंदणी झाल्यामुळे ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत आहे. रुग्णसेवा अधिक चांगली व्हावी यासाठी डॉक्टरांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. काही रक्त तपासण्या आपल्या रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे त्या माणगाव किंवा बाहेरील प्रयोगशाळेत करून घ्याव्या लागत आहेत. मात्र यावर लवकरच उपाययोजना करून रुग्णांना सर्व तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रफुल्ल पावशेकर, श्रीवर्धन तालुका वैद्यकीय अधीक्षक