Rotha Supari Shrivardhan : श्रीवर्धनची ‘रोठा सुपारी’ पुन्हा बहराकडे!

45 हजार रोपांची खरेदी; निसर्ग चक्रीवादळात बागांचे झालेले 70 टक्के नुकसान
Rotha Supari Shrivardhan
श्रीवर्धनची ‘रोठा सुपारी’ पुन्हा बहराकडे!pudhari photo
Published on
Updated on

श्रीवर्धन : कोकण किनारपट्टीवर वसलेला श्रीवर्धन तालुका सुपारी उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील श्रीवर्धन रोठा सुपारी ही खास जात पांढर्‍या मऊ गरामुळे, मोहक आकारामुळे आणि उत्कृष्ट चवीमुळे बाजारात हमखास चांगल्या दरात विकली जाते.

मात्र 2020 साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने या सुपारी बागायतदारांवर मोठे संकट आणले. तालुक्यातील सुमारे 70 टक्के पोफळी (सुपारी) बागा उद्ध्वस्त झाल्या. उरलेल्या बागांमध्ये रोगराई, किडींचा प्रादुर्भाव वाढला. अनेक बागायतदार आर्थिक अडचणीत आले. 2015-2020 दरम्यान वार्षिक सुमारे 3.75 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवणार्‍या या क्षेत्राला जबरदस्त फटका बसला.

या आपत्तीला सामोरे जाताना श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्‍यांनी हार न मानता पुन्हा नव्या जोमाने रोठा सुपारीची लागवड सुरू केली. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व नर्सरीतून आतापर्यंत 45 हजार रोपे खरेदी करण्यात आली आहेत. या नव्या लागवडीमुळे पुढील काही वर्षांत उत्पादन पुन्हा वाढेल, असा विश्वास शेतकर्‍यांना वाटतो.

रोठा सुपारी लागवड ही अत्यंत शिस्तबद्ध आणि मेहनतीची प्रक्रिया आहे. 6-7 वर्षांनी फळधारणा होते. योग्य ओलावा, पाण्याचा निचरा आणि हवामानानुसार शिपणं (पाणी सोडणे) आवश्यक. पाण्याचा अभाव झाल्यास फळगळ, तर जास्त पावसात फळ तडकते. सुरुवातीला 4 वर्षे कुंपण घालून गुरे-ढोऱांपासून रोपे सुरक्षित ठेवावी लागतात. उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी छाया व्यवस्था करावी लागते. योग्य पाणी व खत मिळाल्यास सातव्या वर्षांपासून दर्जेदार सुपारी मिळते.

श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या नव्या मोहिमेत मार्गदर्शक ठरत आहे. 45 हजार नव्या रोपांपासून दरवर्षी 130-140 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे, असे केंद्राचे अधिकारी डॉ. सिद्धेश सावंत यांनी सांगितले. यावर्षी तयार केलेल्या 10, हजार रोठा सुपारी रोपांपैकी 1,500 रोपे आधीच विकली गेली . सुमारे 1-1.5 वर्षांच्या रोपाची किंमत 40 रुपये आहे. 365.25 हेक्टर क्षेत्रात सुपारी लागवड. समुद्रकिनार्‍यावरील गाळाची, निचरा होणारी, बारमाही ओलावा असणारी जमीन सुपारीसाठी उत्तम. 20-35 सेल्सिअस तापमान योग्य. नैसर्गिक आपत्तीपूर्वी वार्षिक 626.17 मेट्रिक टन उत्पादन. हेक्टरमागे 2.25 मेट्रिक टन उत्पादकता. पांढर्‍या, मऊ गरामुळे बाजारात उत्कृष्ट मागणी.

बागायतदारांनी पुन्हा एकदा रोठा सुपारीला प्राधान्य दिले आहे. संशोधन केंद्रातील दर्जेदार रोपे, तांत्रिक मार्गदर्शन, आधुनिक पद्धती - या सर्वांच्या मदतीने पुढील 5-7 वर्षांत श्रीवर्धन तालुका पुन्हा सुपारी उत्पादनात भरभराटीला येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासनाची कर्ज सुविधा, बाजारपेठ विकास, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर या सर्वांचा योग्य मेळ साधला, तर श्रीवर्धन रोठा सुपारी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही आपली खास ओळख निर्माण करेल!

श्रीवर्धन तालुक्यात 365.25 हेक्टर क्षेत्रात सुपारीची लागवड आहे. रोहयो अंतर्गत फळबाग लागवडीसाठी प्रति हेक्टर 2.12 लाखांचे अनुदान उपलब्ध आहे. सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत 35टक्के अनुदान साधारण 10 लाखांपर्यंत मिळू शकते. शेतकर्‍यांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत होणार असून सुपारीचे ब्रँडिंग करून बाजारपेठेत वेगळा दर्जा मिळवण्याचा उद्देश आहे. भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून जीआय मिळाल्यास श्रीवर्धन सुपारीची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. कंपनीमार्फत विक्री, प्रक्रिया आणि ब्रँडिंग सुलभ होईल. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. संशोधन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळू शकेल. एकूणच सुपारीला नवा बाजार मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुनील जाधव, कृषी आधिकारी, श्रीवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news