

श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यात गुटखा बंदीची अंमलबजावणी पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 98,000 रुपयांचा गुटखा जप्त करून श्रीवर्धन पोलिसांनी गुटखा माफियांना मोठा धक्का दिला होता. त्या कारवाईनंतर तब्बल तीन महिने माफियांनी पुरवठा थांबवला. मात्र, गेल्या आठवडाभरात गुटख्याचे वितरण पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र शासनाने तंबाखू, निकोटीन आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू उत्पादनांवर पूर्ण बंदी घातली आहे.तरीही श्रीवर्धन शहर आणि तालुक्यातील निवडक टोबॅको दुकाने व टपऱ्यांवर सदर पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
श्रीवर्धन पोलिसांच्या मते, गुटखा विक्रेत्यांवर सतत लक्ष ठेवून कारवाया केल्या जात आहेत. पर्यटकांकडून सोबत आणलेला माल स्थानिकांकडे फिरत असल्याचीही शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. नागरिकांनी गुटख्याशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. श्रीवर्धन पर्यटनस्थळ असल्याने कायद्याचे पालन अत्यावश्यक आहे.
उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन पोलीस ठाणे
एप्रिल 2024 मध्ये ऋऊ- आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत काही टपऱ्यांवर धाड टाकूनसामग्री जप्त करण्यात आली होती. गुटखा विक्री करणाऱ्या काही दुकानांवर बनावट ग्राहक पाठवून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्नही झाला.परंतु, खबऱ्यांनी आधीच माहिती गळवल्याने काही ठिकाणी कारवाई निष्फळ ठरली.
तीन महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका वितरकाच्या कारची झडती घेतली असता गुटख्याच्या पिशव्या जप्त झाल्या होत्या.या कारवाईनंतर गुटखा जाळे काही काळ थंडावले होते.पण आता पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास वितरण वाढल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.