Coastal erosion Shrivardhan : श्रीवर्धन किनार्‍याला उधाणाचा तडाखा

रॅम्प, पायर्‍या, लाद्या उखळल्या; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Coastal erosion Shrivardhan
श्रीवर्धन किनार्‍याला उधाणाचा तडाखाpudhari photo
Published on
Updated on
श्रीवर्धन : भारत चोगले

श्रीवर्धन : कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनार्‍याला गेल्या काही दिवसांपासून जोरदार लाटा आणि उधाणाचा मोठा फटका बसत आहे. किनार्‍याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या बंधार्‍यावर केलेले सौंदर्यीकरण आणि सुविधा या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत.

विशेषतः बंधार्‍यावर पर्यटकांसाठी बांधलेला रॅम्प आणि पायर्‍यांवरील ग्रॅनाइटच्या लाद्या लाटांच्या तडाख्यातून पूर्णपणे उखडून गेल्या आहेत. या ठिकाणी खोल मोठे तडे पडले असून, रॅम्पचा काही भाग कोसळून बंधार्‍यातून उखडला आहे. परिणामी स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना समुद्रकिनार्‍यावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानीय नागरिकांच्या मते, सध्या लाटा इतक्या जोरात येत आहेत की बंधार्‍याचे मोठमोठे दगडही किनार्‍यावर ओढले जात आहेत. मठाचा गवंड, केतकी बन, गणपती विसर्जन रस्ता या ठिकाणचे रॅम्प आणि पायर्‍या पूर्णपणे मोडल्या गेल्या आहेत. तुटलेल्या लाद्या आणि दगड विखुरले असल्यामुळे पाय मुरगळणे, घसरून पडणे अशा अपघातांची शक्यता वाढली आहे.

सदर बंधारा 2009 साली श्रीवर्धन नगरपरिषदेने सुमारे दीड किलोमीटर लांबीचा बांधला होता. दांडा विभाग ते महेश्वर पाखाडी येथील नाल्यापर्यंत हा बंधारा उभारण्यात आला होता. यामागचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समुद्राच्या उधाणामुळे होणारे नुकसान टाळणे. पाण्यामुळे वस्ती, शेती, वाड्यांमध्ये होणारे आर्थिक नुकसान रोखणे हे या बांधकामाचे मूळ कारण होते.

पुढे पर्यटनाच्या दृष्टीने या बंधार्‍यावर सुशोभीकरण करण्यात आले. पर्यटकांसाठी सुंदर ग्रॅनाइट लाद्या, बाके, आकर्षक दिवे, शोभिवंत झाडे, सुमारे दीड किलोमीटर अंतरावर भव्य पायर्‍या आणि गणपती विसर्जनासाठी रॅम्प बांधण्यात आले. या सुविधा पर्यटनवाढीला चालना देत होत्या. परंतु अलीकडील उधाणामुळे या सर्व सुविधा मोडकळीस आल्या आहेत.

पर्यटन व्यवसायालाही फटका

सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की स्थानिक आणि पर्यटकांना या मोडकळीस आलेल्या रस्त्यांवरून धाडस करूनच किनार्‍याकडे जावे लागते. पर्यटकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या बंधार्‍याची दुरुस्ती तातडीने न केल्यास येत्या पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक नागरीकांनी श्रीवर्धन नगरपरिषदेची तातडीने दखल घेऊन या रॅम्प, पायर्‍या आणि लाद्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मजबूत पावले उचलावीत, अन्यथा येथील पर्यटन व्यवसायालाही फटका बसेल, अशी जोरदार प्रतिक्रिया येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news