

श्रीवर्धन ः श्रीवर्धन तालुक्यात आधार कार्ड संदर्भातील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. शासनाने विविध शासकीय सेवा, दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले असताना, तालुक्यात आधार दुरुस्ती किंवा नविन नोंदणीसाठी एकही सुविधा केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक नागरिकांच्या आधार कार्डमध्ये जन्मवर्ष चुकीचे आहे किंवा नावात अक्षरांची चूक आहे., या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पनवेल, अलिबाग किंवा मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो., श्रीवर्धन तालुका हा प्रामुख्याने ग्रामीण असून, येथे निरक्षरांची संख्या मोठी आहे. त्यांना या प्रक्रियेतील तांत्रिक बाबी समजून घेणे कठीण जाते. तालुक्यातील तहसील कार्यालयात मोठी गर्दी असते, पण आधारसंबंधित कोणतेही मदत केंद्र कार्यरत नाही, तरुण वर्ग बहुतेक वेळा मुंबईत व्यवसायासाठी असल्याने, वेळेत दुरुस्ती करणे शक्य होत नाही.
या समस्येबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. घरात आधार कार्ड बनतो का? असा संतप्त प्रश्न आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने जर प्रत्येक दस्तऐवजासाठी आधार बंधनकारक केला असेल, तर त्या सेवा गावागावात पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, हे विसरले जाऊ नये. श्रीवर्धन शहरात तातडीने आधार सेवा केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे.
या गंभीर विषयावर श्रीवर्धन नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अनंत गुरव यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेत मंत्री तटकरे यांनी संबंधित विभागाला लवकरात लवकर श्रीवर्धनमध्ये आधार सेवा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचे समजते.