Raigad News : रायगडवाडीत आढळला शिवकालीन चुन्याचा घाणा
नाते : इलियास ढोकले
रॉयल रायगड प्रतिष्ठान या संस्थेने रायगड वाडी येथे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची फलश्रृती एका अनपेक्षित यशाने झाली आहे. या मोहिमेदरम्यान, जमिनीखाली गाडला गेलेला सुस्थितील एक चुन्याचा घाणा आणि त्यात फिरणारे एक पुर्णाकृती चाक संस्थेच्या सदस्यांना आढळून आले. या अनपेक्षित अशा यशामुळे किल्ले रायगडच्या पायथ्यालाही मोठा एतिहासिक ठेवा असू शकतो याची खात्री निर्माण झाली आहे.
रायगड वाडी येथील एका ऐतिहासिक जागेच्या सफाईचे काम या प्रतिष्ठानचे सदस्य करित होते.नाणे दरवाजाच्या खाली असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील आमराईत हे सफाईचे काम सुरु असताना हा घाणा आढळून आला. या घाण्यामुळे किल्ले रायगडच्या उभारणीत गड पायथ्याच्या गावांच्या योगदानावर प्रकाश पडणार आहे. जो घाणा आढळून आला आहे , त्यामध्ये घाणा आणि तो चालविण्यासाठी सुस्थितीत असलेले दगडी चाक यांचा समावेश आहे. ते काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले.
सध्या रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उत्खननाची कामे सुरु आहेत. त्यामध्ये विविध ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. या स्वच्छता मोहिमेत श्रमदान मोहीम सर्वेश पवार, सूरज कदम, कर्तव्य जाधव, राकेश कवितीया, गौरव धोंडगे, सौरभ धोंडगे, अश्विनी मोरे, आदित्य कासारे, रोहन कदम, वरदान कदम, महेश कदम, वैभव सकपाळ, कुणाल निकम, विवेक कासारे, प्रेम सुतार, सुदेश सुतार, मयूर कदम, सुरज जाधव शुभम जगताप, समीक्षा चव्हाण, प्रणाली निकंम, हितेश जाधव, विनय धाडवे, निकिता खेडेकर, विशाल कदम, अनिकेत चोरगे, पंकज पवार,प्रथमेश पवार,शिवराज जंगम स्वप्नील धोंडगे या सदस्यांनी सहभाग घेतला
दहा फुटी व्यासाचा घाणा
या छायाचित्रांमधून दिसणार्या चुन्याच्या घाण्याचा व्यासाचा आकार हा किमान दहा फुटी व्यास असलेला आहे असे दिसते. चुन्याचे घाणे म्हणजे गडाच्या बांधकामासाठी चुना तयार करण्याचे ठिकाण. किल्ल्यांवर चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे, आणि तो करण्यासाठी हे घाणे (घिरट्या घालण्याचे यंत्र) वापरले जात.
या घाण्यात, चुन्याच्या दगडांना पाणी, गूळ आणि भाताचे तूस यांच्यासोबत मिसळून ते दगडी जात्याखाली फिरवले जायचे, ज्यामुळे चुना मऊ आणि एकजीव होत असे. चुनखडीला पाण्यात मिसळून, त्यात गूळ आणि भाताचे तूस टाकून ते दगडी जात्याखाली बैलांच्या मदतीने फिरवले जायचे. यामुळे चुना मऊ आणि एकजीव होऊन बांधकामासाठी योग्य होत असे. यापूर्वी रोहिडा, विसापूर आणि वसंतगड किल्ला यांसारख्या किल्ल्यांवर शिवकालीन चुन्याचे गाणे आढळून आले आहेत. अशी माहिती पुरातत्वशास्त्र आणि इतिहास अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांनी दिली.

