पनवेल : पनवेल तहसील कार्यालयाच्या सेतु सुविधा केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ’सर्व्हर डाऊन’ समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सुरू झालेली ही अडचण सोमवारीही कायम राहिल्याने सकाळपासूनच केंद्रासमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विशेषतः विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी आज अर्ज करण्याचा दिवस महत्त्वाचा होता. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेची अंतिम टप्प्यात असताना, प्रमाणपत्रांच्या विलंबामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत होते.
अनेक नागरिकांनी सांगितले की, कार्यालयात आवश्यक त्या सेवा देणारा कर्मचारीही आपल्या खिडकीवर अनुपस्थित होता. त्यामुळे माहिती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना कुणीच योग्य उत्तर देत नव्हते. काही नागरिक सकाळी 8 वाजल्यापासूनच रांगेत उभे होते, पण दुपारपर्यंतही त्यांच्या कामाचा काहीच निरोप लागलेला नव्हता. अंतिम तारीख जवळ आली आहे, वेळ वाया जातोय. प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था केली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
मी शुक्रवारपासून इथे चकरा मारतोय, पण ’सर्व्हर डाऊन’ म्हणत परत पाठवतात. आजही फारशी काहीच सेवा मिळालेली नाही.
संतोष पाटील, स्थानिक नागरिक
माझ्या कॉलेजच्या फी सवलतीसाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण वारंवार त्रास सहन करावा लागत आहे.
रुचिका महाडिक, विद्यार्थिनी