म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
रायगडात खा.सुनील तटकरे यांच्या होमपिचवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांची जाहीर सभा शनिवारी ( 16 नोव्हेेंबर) म्हसळा येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पवार काय समाचार घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप पाच्या फैरी सुटत आहेत. राज्यातील रायगड जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघांपैकी राजकीय दृष्टया एक महत्वाचे मतदार संघ म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ आहे.
2009 साली आमदार म्हणून निवडून आलेल्या सुनिल तटकरे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली ही जबाबदारी देखील सुनिल तटकरे यांनी पेलून श्रीवर्धन मतदारसंघासह रायगड जिह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. राज्यात सत्ता बदल होत गेल्या त्यामध्ये तटकरेनी देखील वार्याप्रमाणे पाठ फिरवत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेत श्रीवर्धन मतदार संघाचा विकास, हाच आमचा ध्यास... ही खूणगाठ मनाशी बांधून गावागावात विकासाची कामे केली. विरोधकांना चारी मुंड्या चित करत जनतेला आपल्या बाजूने खेचण्याची एकही नामी संधी तटकरे यांनी सोडली नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि रायगड जिह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पालेमुळे रोवण्यात आणी ध्येय धोरणे जनतेपर्यत पोहचविण्यात सुनिल तटकरे आघाडीवर राहिले म्हणूच गुरु शरद पवार यांचा शिष्य सुनिल तटकरे यांचेवरचा विश्वास वाढत गेला. राज्याच्या राजकीय पटलावर शरद पावर आणि सुनिल तटकरे यांचे गुरु - शिष्याचे नाते अवघ्या महाराष्ट्राला अवगत झाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या निवडणूक प्रचाराचे निमित्ताने संबोधित करण्यासाठी म्हसळा येथील सकळप गावचे दिघिरोड मैदान येथे उद्या शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी खासदार सुनिल तटकरे यांचे राजकीय गुरू, दस्तूरखुद्द, राजकारणातील वस्ताद शरद पवार हे तटकरेंच्या होम पिचवर बॅटिंग करायला येणार आहेत. मात्र ही बॅटिंग तटकरे यांचे साठी नसून नवीन खिलाडी (उमेदवार) अनिल नवगणे यांचेसाठी असणार आहे. त्यामुळे अनेक वर्ष सोबत असलेले खासदार सुनिल तटकरे यांचे बाबत शरद पवार काय बोलणार.. ? याकडे श्रीवर्धन मतदार संघासह रायगड जिल्हा आणि अवघ्या महाराष्ट्राचे देखील लक्ष लागून राहिले आहे.
शरद पवार श्रीवर्धन मतदार संघांसाठी काय नवीन घोषणा करणार, विकासाचे बाबतीत नवीन धोरण जाहीर करणार का..? त्याचबरोबर आपला फुटलेला पक्ष रायगड जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी नवे सवंगडी, नव्या दमाचे नवे कार्यकर्ते अशा सर्वांनाच नवीन काय कानमंत्र देणार हे देखील जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे अजित दादांच्या सोबत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांना गुरु शरद पवार काय इशारा देऊन जाणार...? हे देखील पाहणे तितकेच औस्तुक्याचे ठरणार आहे.
बर्याच महिन्यानांतर श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचार निमित्ताने राजकीय गुरु व शिष्य निवडणुकीच्या आखाड्यात परस्पर विचारधारेंनी एकमेकांना भिडणार हे मात्र नक्की असून तूर्तास तरी शरद पवार व सुनिल तटकरे यांच्या राजकीय नात्यावर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे असे म्हटले तर काही वावागे ठरणार नाही.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून आणि महायुती तर्फे आदिती तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटप मधील रस्सीखेच स्पर्धेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली आहे. या मध्ये ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतलेले अनिल नवगणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आता खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पहायला मिळत आहे.