

महाड : श्रीकृष्ण बाळ
रायगड किल्ल्यावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय समोर आला आहे. किल्ले रायगडासाठी दुसऱ्या रोपवेच्या निर्मितीला मंजुरी मिळाल्याने गडावर पोहोचण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त भेट देतात. विशेषतः शिव-राज्याभिषेक सोहळा, जयंती, पुण्यतिथी तसेच विविध ऐतिहासिक कार्यक्रमांच्या वेळी येथे मोठी गर्दी होत असते.
सध्याच्या रोपवे सुविधेवर अनेक वेळा वाढत्या गर्दीचा ताण जाणवतो. वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले तसेच शारीरिक अडचणी असलेल्या शिवभक्तांसाठी गड चढणे आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत दुसऱ्या रोपवेची निर्मिती झाल्यास प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभहोऊन वेळेची बचत होईल. तसेच गर्दीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. रायगड हा केवळ एक किल्ला नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि इतिहासाच्या गौरवाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडाची निवड केली होती. त्यामुळे या गडावरील प्रत्येक विकासकाम करताना त्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन रोपवे उभारताना गडाच्या नैसर्गिक सौंदर्याला आणि पुरातत्त्वीय महत्त्वाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
नवीन रोपवेची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करून आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात यावी, अशी अपेक्षा शिवभ-क्तांकडून व्यक्त केली जात आहे. रोपवे परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवासी नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे.
दुसरा रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटन विकासासोबतच रायगड परि-सरातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा सकारात्मक फायदा होईल.
मात्र विकास करताना रायगडाच्या ऐतिहासिक पवित्रतेचे आणि पर्याव-रणाचे संवर्धन हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. सुविधा वाढवताना गडाचे मूळ स्वरूप, शांतता आणि ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. दुसऱ्या रोपवेमुळे शिवभक्तांचा प्रवास अधिक सोपा होणार असला तरी या प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. रायगडाच्या वैभवाला साजेशी ही सुविधा भविष्यात लाखो शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरू शकते.
रोजगाराच्या नव्या संधी
नवीन प्रस्तावित असलेल्या या रोपवेमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील युवक तसेच व्यवसाय धारकांना ही सुवर्ण संधी असल्याचे मानण्यात येत आहे.