शनिवारी सकाळी पनवेल शहरातील तक्का परिसरात एका प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी 24 तासांत उल्लेखनीय तपास करून भिवंडी येथून त्या अर्भकाचे आई-वडील शोधून काढत त्यांना ताब्यात घेतले. अमान इकबाल कोंडकर असे अटक केलेल्या निर्दयी बापाचे नाव आहे. हे अर्भक कोंडकर यांच्या विवाहपूर्व संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शनिवारी सकाळी तक्का परिसरातील रस्त्यावर एका प्लास्टिकच्या बास्केटमधून रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तात्काळ पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बाळाला ताब्यात घेतले. या अर्भकासोबत एक भावनिक चिठ्ठीही सापडली, ज्यामध्ये बाळाच्या आईवडिलांनी त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे बाळ वाढवणे शक्य नसल्याचे नमूद करत, समाजाला बाळाची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
या घटनेनंतर पनवेल शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 2 यांच्या संयुक्त पथकांनी तपास सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालयातील नोंदी, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे भिवंडी परिसरातील एक कुटुंब संशयाच्या केंद्रस्थानी आले. माहिती मिळाल्या नंतर गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन च्या पथकाने भिवंडी येथे धाड टाकून संबंधित दांपत्याला ताब्यात घेतले. यात पोलिसाना धक्कादायक माहिती मिळाल्याचे समोर आले आहे.
या अर्भकाचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाल्याची कबुली आरोपी बापाने पोलिसांना दिली आहे. त्या मुळे, या बळाचा सांभाळ करणे आम्हाला शक्य नसल्याने बाळाला घेऊन, पनवेल शहरातील त परिसरात आणणे सोडल्याची कबुली, निर्दयी बापाने पोलिसांकडे दिली.