विकासाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधून राज्याची उन्नती साधण्याचे ध्येय राज्यातील महायुती सरकारने उराशी बाळगले आहे. त्या योगदानात सर्व सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, गावागावात विकासाची स्पर्धा वाढावी, यासाठी येत्या सप्टेंबरपासून राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामयोजना ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यात प्रथम येणार्या गावाला पाच कोटीचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी पनवेल येथे केली.
दैनिक पुढारीतर्फे पनवेल येथे ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील 40 जणांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ना. गोरे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी आणि खारभूमी विकास मंत्री ना. भरत शेठ गोगावले उपस्थित होते. ग्रामविकास झाला तर आपोआप राज्याचा, देशाचा विकास होणार आहे. हे ओळखून सरकारने आता येत्या सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना ही स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यात प्रथम येणार्या गावाला 5 कोटी, दुसर्या क्रमांकाला 3 कोटी, तृतीय क्रमांक दीड कोटी तर चतुर्थ क्रमांक येणार्या गावाला 1 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
ही स्पर्धा विभागीय, जिल्हास्तरीय, आणि तालुका स्तरावरही घेतली जाणार असून. तेथेही अशाच प्रकारे बक्षिसे दिली जाणार असल्याची घोषणा गोरे यांनी यावेळी केली. स्पर्धेत भाग घेणार्या गावांना आपल्या गावातील सर्वोत्तम कामे करून दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही निकोप स्पर्धा ग्रामविकासासाठी एक चळवळ बनविण्याचा संकल्प ही ना. गोरे यांनी यावेळी केला.
ना. गोरे यांनी भाषणातून सरकारच्या विकास कामांचा आढावाही घेतला. ग्रामविकास आणि रोहयो ही दोन्ही खाती ग्रामीण विभागाशी निगडीत असून गावांच्या विकासासाठी या दोन्ही खात्यानी हातात हात घालून काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत रोजगार हमी योजनेचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
दै.पुढारी आयोजित आदर्श सरपंच सन्मान सोहळा बुधवारी ( 18 जून) पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगडसह ठाणे,पालघर जिल्ह्यातील आदर्श सरपंच आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कोकणातील ‘आदर्श सरपंचांचा सन्मान’ आणि ‘आदर्श गाव बनवू या’ अशी मोहिम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे ग्रामविकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला.
या कार्यक्रमाची जोरदार तयारी पुढारी परिवारातर्फे करण्यात आली होती. या कार्यक्रमाला माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार, प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त माणिकराव दिवे रायगड जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पालघर जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पनवेल महा पालिका उपायुक्त वैभव विधाते,आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुढारीच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
पुढारी परिवारातर्फे रायगड, ठाणे, पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, पुढारीचे मुंबई मार्केटिंग हेड अमितकुमार तळेकर, यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्र संचालन रायगड आवृत्ती प्रमुख जयंत धुळप यांनी केले. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील 40 आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दै. पुढारीतर्फे मलेरिया मुक्तीसाठीही विशेष अभियान राबविले जात आहे. याचाही शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.हे. स्वयंपूर्ण गाव आणि सक्षम गाव ही संकल्पना घेऊन हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सन्मानित करण्यात येणार्या या आदर्श सरपंचांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच नासिकेत कावजी, नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच उदय बाबू म्हात्रे, आवास ग्रामपंचायतीच्या सरपंच अभिलाषा अभिजित राणे, सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक, मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश पाटील, कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचे अजय म्हात्रे, पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवीशेठ वाजेकर, पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ठाकूर, महाड तालुक्यातील लोअर तुडील ग्रामपंचायतीचे सरपंच उमरखान देशमुख, लाडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मुबिना निसार ढोकले, गोंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष अशोक खताते, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे, खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वामन कवळे, म्हसळा तालुक्यातील कणघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रश्मी संतोष सावंत, तळा तालुक्यातील गिरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश नरेंद्र लोखंडे, प्रमोद भिंगारकर सरपंच ग्रामपंचात विचुंबे, मंगेश शेलार सरपंच ग्रामपंचायत करंजाडे, सौ. योगिता राजेश पाटील सरपंच ग्रामपंचायत पालीदेव, सौ. भारती सचिन पाटील सरपंच ग्रामपंचायत आकुर्ली, अजित वसंत पाटील, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी-उरण आणि माणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी प्रमोद रामचंद्र घोसाळकर, मापगाव येथील कार्यकर्ते सचिन हरिश्चंद्र घाडी, पेण येथील लोकप्रतिनिधी समीर म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.
ना. भरत गोगावले यांनी सरपंच सन्मान आयोजित केल्यावद्दल पुढारी परिवाराचे अभिनंदन केले. गावासाठी चांगले विकासात्मक कार्य करणार्या सरपंचांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित केले. हे निश्चितच अभिमास्पद असून त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवत अन्य गावातील सरपंचांनी असंच चांगले समाजाभीमुख कार्य गावाच्या विकासासाठी करावे, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले.
आम. प्रशांत ठाकूर यांनीही आपल्या भाषणातून सरपंच हा ग्रामविकास प्रक्रियेतील महत्वाचा घटक असल्याचे नमूद केले. आज अनेक गावातील सरपंचांनी सरकारी योजना प्रभाविपणे राबवून विकास साधला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचाही विनियोग गावाच्या विकासासाठी करून घेतला जात आहे हे निश्चित अभिमानास्पद असेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आव्हाने ही संधी समजून कामे करा, असा सल्ला देत आलेले आहेत. त्यानुसार सरपंच यांनीही ग्राम विकास हे आव्हान समजून चांगले कार्य करावे आणि विकासाची घोडदौड सुरू ठेवावी असे आवाहन आ. प्रशांत ठाकूर यांनी केले.यावेळी त्यांनी पुढारीने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
ना. गोरे यांनी आपल्या भाषणातून दैनिक पुढारीने सुरू केलेल्या आदर्श सरपंच सन्मान आणि आदर्श गाव बनवूया या उपक्रमाचे कौतुक केले. निर्भीड पत्रकारितेचा वसा जोपासणार्या पुढारीने समाजाच्या मूलभूत समस्याना वाचाही फोडली. विकास प्रक्रियेत जागल्याची भूमिकापण बजावली.आपल्या यशस्वी जीवनात पुढारीचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले.आमच्या सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली असल्याचे नमूद केले.
केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतं असून, रोजगार हमी योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी करून सरपंच यांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले यांनी केले.
गोगावले यांनी अत्यंत प्रभाविपणे आपले विचार मांडले. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवातही सरपंच पदापासून झाली असून गावातील लोकांचा विश्वास संपादित करून मंत्रिपदापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. सरपंच हाच त्या गावचा मालक असतो. त्यामुळे गावातील प्रमुख समस्या म्हणजे पिण्याचे पाणी, गटारे, लाईट या आहेत. त्या प्रामुख्याने सोडवाव्याचं लागतात, असे त्यांनी सांगितले. आज केंद्रातील आणि राज्यातील सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या योजना गावागावात पोहोचवून त्यांची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे काम हे गावप्रमुख म्हणून सरपंचांना करावे लागणार आहे. त्या योजना राबविल्या गेल्या तर निश्चितपणे गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.
रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येतं असलेल्या विविध योजनांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली. ग्रामविकास आणि रोहयो ही दोन्ही खाती ग्रामविभागाशी निगडीत असून सरकारमधील हे दोन्ही विभाग समन्वय साधून विकासाची कामे करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.