

महाड: शिक्षण विभागाचा कणा मानली जाणारी समग्र शिक्षा योजना केंद्र सरकारने थांबवल्याने रायगड जिल्ह्यातील तब्बल 115 कर्मचारी बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यभरातील कर्मचारी 9 मार्चपासून आझाद मैदानावर तीव्र आंदोलन सुरू असून यामध्ये देखील रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. ही योजना बंद झाल्याने शिक्षण विभागातील अनेक शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत.
समग्र शिक्षा अभियान ही गुणवत्तेवर भर देणारे पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी भारत सरकारची एक एकात्मिक योजना आहे. ही योजना 2018-19 मध्ये सुरू झाली. शिक्षणात समानता आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिली ते बारावीपर्यंत शालेय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्ता वाढवणे, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि लिंग भेदभावाच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणे यावर या योजनेत भर दिला जातो.
या योजनेमध्ये रायगड जिल्ह्यातील सुमारे 115 कर्मचारी काम करत आहेत. योजनेमधील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सहा महिन्याची तात्पुरती नियुक्ती देऊन मध्ये एक महिन्याचा सेवा खंड करून त्यांची पुनर्नियुक्ती केली जात होती.
परंतु यावर्षी 31 मार्चनंतर मात्र कोणत्याही प्रकारची पुनर्नियुक्ती करण्यात आली नाही. केंद्र सरकारने ही योजना थांबवल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.यातील काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.वर्षानुवर्ष या योजनेचा गाडा ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळल्याने अनेक कुटुंब वाऱ्यावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
या योजनेमध्ये वरिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामवर कार्यक्रम अधिकारी एम आय एस समन्वयक लेखा लिपिक विषय तज्ञ संशोधन सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर साधन व्यक्ती अशा अनेक पदांवर काम करणाऱ्या 115 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ही योजना थांबल्याने व कर्मचारी कामावर नसल्याने अनेक शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत. शाळा मूल्यांकन व अन्य महत्त्वाची ऑनलाईन कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी संघर्ष समितीमार्फत करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग
आझाद मैदान येथे 9 मार्चपासून आंदोलन सुरू करण्यात आले असून,राज्यभरातील साडेतीन हजारहून अधिक कर्मचारी या योजनेचा बळी ठरत असल्याने या सर्वांनी नऊ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला आहे.