

रायगड : एकेकाळी मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाच्या र्हासामुळे धोक्यात आलेला सह्याद्रीच्या पर्वतराजीतील पश्चिम घाट आता पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक वैभवाने नटला आहे. गेल्या 15 वर्षांपासून शासन, वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. जागतिक वारसास्थळ आणि जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाटातील हे सकारात्मक बदल केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आशादायक उदाहरण ठरले आहेत.
सुमारे दोन दशकांपूर्वी प्रदूषण, बेसुमार जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे पश्चिम घाटातील परिसंस्थेवर गंभीर परिणाम झाला होता. या धोक्याची जाणीव ठेवून, संयुक्त राष्ट्रांनी 2010 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष’ म्हणून घोषित केले आणि तेव्हापासून संवर्धनाच्या चळवळीला मोठी गती मिळाली. या चळवळीतून झालेली जनजागृती आता फळाला आली आहे. पश्चिम घाटामध्ये 1,500 दुर्मीळ प्रजाती, तर 12 हजार वैविध्यपूर्ण प्रजाती आढळल्याने हा घाट जागतिक हॉटस्पॉट झाला असून, येथे दुर्मीळ फुलपाखरे, पट्टेरी वाघ, हत्ती, सांबर, खवले मांजर, अशी प्राणिसंपदाही पाहायला मिळत आहे.
जागतिकस्तरावर विविध देशांतील एकूण 34 जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्रातील सह्यादी पर्वतराजीतील पश्चिम घाटातील जैवविविधता अतिउच्च दर्जाचे जैवविविधता क्षेत्र मानले जाते. गेल्या 20 वर्षांपूर्वी पश्चिम घाटातील या जैवविविधतेला प्रदूषणापासून ते जंगलतोडीपर्यंतचे विविध धोके निर्माण झाले होते. मात्र, गेल्या 15 ते 20 वर्षांत जंगल, जैवविविधता आणि त्यांचा मानववंशाच्या अस्तित्वासाठी असलेला अनन्यसाधारण संबंध, याबाबत शासन, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून झालेली जनजागृती आणि जंगल व जैवविविधता संरक्षणासह संवर्धनासाठीचे यशस्वी प्रयत्न, यामुळे पश्चिम घाट क्षेत्रातील जैवविविधता समृद्धी ही लक्षणीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर दखलपात्र ठरली आहे.
पश्चिम घाटातील वनस्पतींमध्ये एककोशिकीय सायनोबॅक्टेरियापासून अँजिओस्पर्म्सपर्यंत सुमारे 12,000 प्रजाती आहेत. या स्पेक्ट्रममध्ये फुलांच्या वनस्पती भारतीय वनस्पतींपैकी सुमारे 27 टक्के आहेत, ज्यामध्ये 4,000 प्रजाती आहेत, ज्यापैकी सुमारे 1,500 प्रजाती स्थानिक आहेत. द्वीपकल्पीय भारतातील बहुतेक स्थानिक वनस्पती पॅलिओएंडेमिक आहेत, ज्यांना पश्चिम आणि पूर्व घाटांच्या दोन्ही बाजूंच्या टेकड्यांमध्ये अनुकूल पर्यावरणीय कोनाडे आढळले आहेत. स्थानिक प्रजातींच्या वितरणाचा विचार करता पश्चिम घाटातील पर्यावरणीय कोनाडे बेटांसारखे दिसतात. यापैकी अनेक प्रजाती औषधांचा पारंपरिक स्रोत आहेत. भारतातील बहुतेक औषधी वनस्पती उच्च फुलांच्या वनस्पती आहेत, ज्यात झाडे 33 टक्के, झुडपे 20 टक्के, औषधी वनस्पती 32 टक्के, वेलवर्गीय 12 टक्के आणि इतर 3 टक्के आहेत.