

किशोर सुद
अलिबाग: मुसळधार पाऊस आणि कोकणातील नद्यांना येणारा पूर या पार्श्वभूमीवर कोकणातील शतकोटी जुने ब्रिटिशकालीन पूल आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यंदाच्या पावसाळ्यातही तितकाच गंभीर बनला आहे.
२०१६ मधील महाडच्या सावित्री नदीवरील भीषण दुर्घटनेला आता एक दशक पूर्ण होत आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षीही मान्सूनपूर्व बैठकांमध्ये जुन्या पुलांच्या सुरक्षेचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांत या ऐतिहासिक पण जर्जर झालेल्या पुलांवरून आजही धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुना नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अत्यंत जुना आणि अरुंद आहे. पावसात नदीला पूर आल्यास पाणी थेट पुलाच्या पातळीपर्यंत पोहोचते, ज्यामुळे रात्रीची वाहतूक ६० किलोमीटरचा फेरा मारून साकरी-नाटे मार्गे वळवावी लागते. महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पूल मंजूर झाला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी स्थानिक आणि अंतर्गत वाहतुकीचा मोठा ताण अद्यापही याच जुन्या पुलावर आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील जुना पूल ऐतिहासिक आहे. या पुलाच्या समांतर नवीन पूल आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असला, तरी आपत्कालीन स्थितीत किंवा स्थानिक गावांना जोडण्यासाठी या जुन्या संरचनेचा वापर यंदाही पर्याय म्हणून खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाचे ऑडिट करणे आवश्यक बनले आहे.
महाड येथील सावित्री नदीवर नवीन पूल उभारण्यात आला असला, तरी रायगड जिल्ह्यातील अंतर्गत ग्रामीण भागाला जोडणारे अनेक छोटे दगडी कमानीचे आहेत. पेण, रोहा, माणगाव आणि महाड परिसरातील काही जुन्या पुलांच्या सुरक्षेबाबत यंदाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही लोकप्रतिनिधींनी जाब विचारला आहे, कारण अनेक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केवळ कागदावरच आहे.
महाड जवळील गांधारी नदीवर असलेल्या जुन्या पुलाच्या काही भागांची गंभीर दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात नदीची पातळी वाढल्यानंतर या पुलावरून अवजड वाहतूक करणे अत्यंत धोक्याचे ठरणार असल्याने, या पुलावर तात्पुरती वाहतूक नियंत्रण यंत्रणा लावण्याची मागणी केली जात आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट आणि तांत्रिक त्रुटी
प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पुलांची पाहणी केल्याचा दावा केला जातो. परंतु, अनेक जुन्या पुलांच्या बाबतीत प्रशासन केवळ वरवरची दृश्य पाहणी करून अहवाल तयार करते. पुलाच्या पाण्याच्या खाली असलेल्या खांबांची अंतर्गत स्थिती, प्रवाहाच्या वेगवान थपेद्यांमुळे खाली झालेली झीज आणि लोड टेस्ट (भार सोसण्याची क्षमता) तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अजूनही संथ गतीने होत आहे. ही उदासीनता पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरू शकते.
अल्ट्रासोनिक आणि स्पॅन लोड टेस्टची मागणी
ब्रिटीशकालीन पूल आणि त्याच बराेबर मुंबई गाेवा राष्ट्रीय महामार्गांवरील पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६ च्या पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन 'अल्ट्रासोनिक' आणि 'स्पॅन लोड टेस्ट'द्वारे पुलांची अंतिम तपासणी करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी धाेकादायक गाेवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत न्यायालयिन लढाई लढत असलेले सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजय उपाध्ये यांनी केली आहे.