

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. खेड्यापाड्यात आरोग्य सेवा पुरविणार्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना वैद्यकीय अधिकार्यांची तसेच कर्मचार्यांची कमतरता भेडसावत आहे. 53 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यात येत असून, यामध्ये अधिकारी, कर्मचार्यांच्या 1 हजार 333 मंजूर पदांपैकी, 511 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये 8 वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, वाडी-वस्तींवरील रुग्णांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात 53 प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित गावच्या जवळपासच्या गावातील रुग्णांच्या लसीकरणासारख्या तसेच इतर काही आरोग्याच्या सोयींसाठी आरोग्य 288 उपकेंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र यांमध्ये 1 हजार 333 अधिकारी कर्मचारी यांची पदे मंजूर असून, 511 पदे रिक्त आहेत. वर्ग 1 व वर्ग 2 वैद्यकीय अधिकारी यांची 8 पदे रिक्त आहेत. यासह आरोग्य पर्यवेक्षक 4, औषध निर्माण अधिकारी 6, आरोग्य सहाय्यक पुरुष 1, आरोग्य सहाय्यक महिला 30, आरोग्य सेवक पुरुष 68, आरोग्य सेवक महिला 321, प्रशिक्षित ताई 2, सफाई कामगार 50, स्त्री परिचर 21 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविताना कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांची दमछाक होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर तसेच इतर सेवक वर्ग असतो. 4-6 उपकेंद्रांच्या मदतीने रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे मुख्य कार्य आहे. स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे. हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण.सहा रोगांवर लसीकरण करणे. गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. हल्ली भारत सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहेत.
शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे. हगवणी सारख्या सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार. निरनिराळया आजारांवर उपचार करणे.संततिनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे.आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे.रोगांचे निदान,उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे.जत्रांमध्ये आणि आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे. अशा प्रकारची मुख्य कामे प्राथमिक आरोग्य केंद्रात असतात.
रायगड जिल्ह्यात 53 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यात येत असून, यामध्ये अधिकारी, कर्मचार्यांच्या 1 हजार 333 मंजूर पदांपैकी, 511 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये 8 वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे.
आरोग्य सेविका महिलांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आरोग्य सेविका महिला पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र लेखी परीक्षेत पात्र न झाल्यामुळे काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताण हा थोडा पडतो पण त्याचा नागरिकांच्या सेवांवर परिणाम होत नाही.
डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्ह्या परिषद, रायगड