

कोप्रोली ः पंकज ठाकूर
ऐरोली गावातील रहिवासी असलेले गोकुळदास पाटील गेल्या 27 वर्षापासून रुईच्या पानांपासून हार बनविण्याच्या व्यवसायात असुन त्यांना या व्यवसायात त्यांच्या पत्नी जनाबाई गोकुळदास पाटील ह्या मदत करत असतात. या रुईच्या पानांच्या हारापासून आर्थिक सहारा निर्माण झालेला आहे.
रामभक्त हनुमान महाराज्यांच्या भक्तांसाठी लागणार्या रूईच्या पानांचे महत्व ओळखुन गोकुळदास पाटील यांनी भक्तांची अडचण ओळखत रूईच्या पानांचे हार बनवायला सुरुवात केली होती. या 27 वर्षाच्या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी यांनी मोलाचे सहकार्य करत सदर माळा बनवून विकत व्यवसाय सांभाळला आहे. रूईच्या फुलांचा वापर फक्त लग्नामध्ये मुंडावळ्या बनवण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो, तर यांच्या पानांचा उपयोग हा मारूती भक्ती साठी केला जात असल्याचे सांगीतले.
रुईच्या शोधार्थ 35 किमी
आता नवी मुंबई येथे शहरीकरण झाल्याने तसेच जेथे ही झाडे होती त्या ठिकाणी भराव झाल्याने आता रूईची पाने मिळत नसल्याने आम्हाला दोघा दाम्पत्याला या पानांसाठी नवी सोडून उरण च्या पुर्व विभागात साधारण 35 किमी अंतरावर यावे लागत आहे. यासाठी खाजगी वाहन तीन चाकी वाहन 1200 रूपये भरून यावे लागत असून यासाठी साधारण दिवसाचा अवधी लागत त्यामुळे आम्हाला दोन दिवस अगोदरच पानांसाठी यावे लागत आहे. पुढे त्यांनी सांगितले की भरावा मुळे अनेक वृक्ष नष्ट ही झाले असून विसर्गाची हानी मोठ्या प्रमाणात नवी मुंबई पट्ट्यात झाल्याचे जाणवत आहे .
असा बनवितात हार
उरण पुर्व विभात आणि पार कधी कधी खारपाडा येथे जाऊन चांगल्या प्रतीची पाने यासाठी निवडावी लागतात. त्यासाठी मोठे वाढलेले रूईचे झाड शोधावे लागते आणि मग त्यावरील चांगली हिरवी गार पाने निवडून काढली जातात आणि मग घरी येऊन सुई धागा वापरून हळूवारपणे ही माळ पुर्ण करावी लागते. यासाठी रुईच्या पानांचा हार बनवण्यासाठी साधारणपणे 11 पानांचा उपयोग करतात. या पानांची माळ हनुमानाला प्रिय आहे, असे मानले जाते.
अकरा पानांची माळ हनुमानाला प्रिय आहे, कारण तो अकरावा रुद्र मानला जातो. या माळेला ’अकरा पानांची माळ’ असेही म्हणतात . रुईच्या पानांमध्ये देवतेचे सूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते, असे मानले जाते.