रोह्यातील टिटवीच्या जंगलात गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन लाखांचे रसायन जागेवरच नष्ट

Roha police raid
Roha police raidPudhari Photo
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहा : रोहा तालुक्यातील टिटवी गावाच्या हद्दीतील घनदाट जंगलात, नदीच्या ओढ्याशेजारी सुरू असलेल्या एका मोठ्या गावठी दारूच्या अड्ड्यावर रोहा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे रसायन आणि इतर साहित्य जप्त करून ते जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवी गावाजवळील जंगल परिसरात हातभट्टीची दारू तयार करून ती मुरुड आणि आसपासच्या भागात विकली जात असल्याची पक्की खबर रोहा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

  • टिटवी गावाजवळील निर्जन जंगल परिसरात सुरू होता अवैध दारू निर्मितीचा कारखाना.

  • रोहा पोलिसांची धडक कारवाई; दारू बनवण्यासाठी लागणारे ३,१५० लिटर रसायन जप्त.

  • सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

पोलिसांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन खासगी वाहनाने टिटवी गाव गाठले. तिथून खबऱ्याने दाखवलेल्या मार्गाने सुमारे एक किलोमीटर पायी चालत त्यांनी जंगल गाठले. नदीच्या ओढ्यामध्ये दोन संशयास्पद झोपड्या आढळून आल्या. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता, आतमध्ये गावठी दारू बनवण्याचा मोठा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले.

या ठिकाणी दारू गाळण्यासाठी लागणारे रसायन भरलेले १८ मोठे प्लॅस्टिकचे ड्रम, लाकडे, दारू बनवण्याची भांडी आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी केलेल्या मोजणीनुसार, या ड्रम्समध्ये एकूण ३,१५० लिटर रसायन होते, ज्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी पंचनामा करून रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने ताब्यात घेतले आणि उर्वरित सर्व रसायन आणि साहित्य जागेवरच तोडून-फोडून नष्ट केले. या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news