

रोहे ः महादेव सरसंबे
रोहा अष्टमी नगरपरिषदेचा आगामी 2026-27 आर्थिक वर्षाकरिताचा 113 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी सादर केला. रोहा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी सांगीतले.
या अर्थसंकल्पामध्ये काही ठिकाणी कर वाढवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी कर कमी करण्यात आले. रोहा अष्टमी नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी खा.सुनील तटकरे, ना.आदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहाचा विकास सुरू आहे या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले असून रोह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, रवींद्र चाळके, निता हजारे आदी उपस्थित होते.
पाणीपट्टीच्या दरात 16 वर्षांनी प्रथमच वाढ
नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपट्टीच्या दरात गेल्या 16 वर्षात प्रथमच वाढ करण्यात आली असून पूर्वी 1800रुपये एका नळ जोडणीला कर होते तो आता 2800 रुपये करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शवदाहीनीचे दर रोहा शहरातील नागरिकांनीसाठी कमी करण्यात आले असून पूर्वी 1500 रुपये होते ते आता कमी करून 500 रुपये करण्यात आले आहेत.
मद्याशी निगडीत व्यवसायांच्या ना हरकत दाखला शुल्कात वाढ
रोहाष्टमी नगरपरिषदेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर व दरपत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. मद्याशी निगडीत व्यवसायांच्या ना हरकत दाखला शुल्कात वाढ करण्यात आली आहे.बिअरशॉपी पूर्वी 5हजार तर आता 10हजार रुपये, बिअरबार परमिट रूम पुर्वी 15 हजार आता 25 हजार, वाईन शॉपी पूर्वी 20हजार आता 30 हजार रुपये, देशी दारूचे दुकान पूर्वी 15हजार आता 25हजार रुपये, ताडी माडी विक्री केंद्र 15हजार रुपये तर आता 20 हजार रुपये करण्यात आली आहे. इतर व्यवसाय ना हरकत दाखला फी दोन हजारावरुन कमी करुन एक हजार करण्यात आली .
मोठे व्यवसाय ना हरकत दाखला फी पूर्वी 1हजार रुपये होती ती 5हजार रुपये करण्यात आली, ज्वेलर्ससाठी ना हरकत दाखला 15 हजार रुपये, हॉस्पिटलसाठी ना हरकत दाखला 25 हजार, दवाखाना क्लिनिक ना हरकत दाखला 5हजार, छोटे व्यवसाय पूर्वी 2 हजार 500 आता 2 हजार रुपये, मोठे हॉटेल कोणतेही बदल न करता दहा हजार कायम आहे.कुंडलिका नदी संवर्धन यासाठी सर्वांना 10हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.ज्येष्ठ नागरिक हॉल तीन तासापासून पुढे प्रति तास पुर्वा 1000 रुपये शुल्क कायम ठेवले असून सुरक्षा अनामत रक्कम 2000 रुपये आहे. ज्येष्ठ नागरिक हॉल वीज वापर दर प्रति युनिट 20 रुपये ठरवण्यात आले आहे.
141 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 7 हजार रुपये अनुदान
रोहा शहरातील 141 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी रक्कम रुपये 7000 रुपये इतके अनुदान देण्यात आले आहे असे नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी महिलांकरता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिलांकरता साबण व वाशिंग पावडर बनवणे, जूटचे वस्तू बनवणे, कापडावरील आरीवर्क याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे असे सांगितले. यास सीएसआर फंडामधून नगरपरिषदेस पाणीपुरवठा विभागांमध्ये ट्रॅक्टर व टँकर करिता दहा लक्ष किमतीचे वाहन प्राप्त झाल्याचे यावेळी सांगितले.पाणीपट्टी बद्दल सांगताना पहिल्यांदाच 16 वर्षानंतर पाणीपट्टी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांना शुज व स्कूल बॅग देण्यात येणार असल्याचे सांगितले.
नागरीकांच्या मागणीनूसार शवदाहिनीचे दर केले कमी
आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी रोहे अष्टमीकर नागरिकांची मागणी असलेली शवदाहिनी चे दर कमी करावी याची पूर्तता करत 1500 रुपये वरून 500 रुपये केली. तर रोहा अष्टमी शहरा बाहेरील नागरिकांसाठी 3000 रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. डिझेल शवदाहीनी फी रोहा शहरातील बीपीएल शिधापत्रिका धारकांना निशुल्क ठेवण्यात आले आहे. गॅस शव दाहिनी भाडे रोहा शहरातील नागरिकांना पुर्वी2000 आता 500 , गॅस शवदाहीनी भाडे रोहा शहरा बाहेरील नागरिकांना पूर्वी 3500 हे कायम ठेवण्यात आले आहे गॅस शवदाहीनी भाडे रोहा शहरातील बीपीएल शीधापत्रक धारकांना निशुल्क ठेवण्यात आले आहे.डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे दरपत्रक आजच्या अर्थसंकल्पिय बैठकीत निश्चित करण्यात आले.