

अलिबाग ः खेडेगावातील परिसरात दिवसा टाटा एस वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसाय करुन, त्याच दरम्यान गावांतील कोणाचे घर सधन आहे, घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत का ? महिलांच्या अंगावर काय दागीने आहेत? अशी रेकी करुन नेमकी घरे हेरुन त्या घरांवर रात्री सशस्त्र दरोडे घालून घरातील माणसांना मारहाण करुन किमती ऐवज लंपास करणारी रायगड जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांत एकूण 17 दरोडे घातलेल्या दरोडेखोरांच्या चव्हाण टोळीतील 6 दरोडेखोरांना गजाआड करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांमध्ये अजय एकनाथ चव्हाण( 23,जि.बिड), पंजाबराव चव्हाण,( 20, जि. छञपती संभाजी नगर),मल्हारी भानुदास चव्हाण,(30, जळगाव),सुनिल प्रकाश चव्हाण, (32, बिड),सोमनाथ भानुदास चव्हाण, (30, जि.जळगाव ),सुजल महेश चव्हाण(19, जि. पुणे) यांचा समावेश आहे. दरम्यान टाटा एस टेम्पो घेवून भाजी विक्रीच्या व्यवसायाआडून गावांत रेकी करणार आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिस आहेत.
रायगड जिल्ह्यशातील सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या तीन गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष करुन सशस्त्र दरोडे घातले होते. शनिवारी 26 जूलैच्या रात्री घरातील मामसे गाढ झोपेत असताना, दरवाजा तोडून घरात घुसून दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवून, तलवारीचा धाक दाखवत घरातील लोकांचे हात-पाय बांधून घरातील दागीने व इतर असा 65 हजार रुपयांपेक्षा अधीक रकमेचा ऐवज लंपास केला होता.
या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथक तयार करुन, सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सूरू करण्यात आला होता.
अखेर दरोडेखोर खालापूर आणि पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार या पाच तपास पथकांनी एकाच वेळी या सर्व ठिकाणी छापे टाकून सहा दरोडेखोरांना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चव्हाण दरोडेखोर टोळीचे सात जिल्ह्यात दरोड्याचे गुन्हे
मुळचे बिड जिल्ह्यातील असलेल्या चव्हाण दरोडेखोरांच्या या टोळीने पहिला गुन्हा सन 2000 मध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगांवमध्ये केला असून त्यानंतर मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, नाशिक,परभणी,बुलढाणा आणि ठाणे जिल्ह्यात दरोड्याचे गुन्हे केले आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यांतील मुरबाड व टकवडे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दरोड्यांचे गुन्हे त्यांनीच केल्याची कबूली त्यांनी दिली आहे.
नागरिकांनी सतर्क राहाणे आवश्यक - आपल्या गावांत विशेषता खेडे गावांत कोणी अपरिचित अचानक येवून काही व्यवसाय वा अन्य काही करित असेल तर त्याची माहिती नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. प्रसंगी त्यांच्या आणि त्यांच्या जवळील वाहनाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवावा. अधिक संशयास्पद वाटल्यास सत्वर पोलिसांना कळवावे. जेणे करुन अनूचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांना त्या बाबत सत्वर कारवाई करणे शक्य होवू शकेल.
आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधिक्षक, रायगड