

कळंबोली :गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या विशेष रो-रो कार सेवेला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नसल्याचे आरक्षणावरुन दिसत आहे. रो-रो कार सेवा नवीन असल्याने आणि कोकणात जाणारे प्रवासी साधारणतः शेवटच्या आठवड्यात ही सेवा आरक्षित करतील असा अंदाज असल्याने आगामी आठवड्यात आरक्षण वाढेल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील खड्डेमय रस्ते आणि रेल्वे गाड्यांची तिकिटे मिळण्यात होणारी अडचण लक्षात घेऊन, कोकणवासीयांना स्वतःच्या वाहनासह सोयीस्कर प्रवासासाठी कोकण रेल्वेकडून विशेष कोलाड-वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, थेट सेवा असल्याने आणि वेळेचा अपव्यय होत असल्याच्या कारणावरून प्रवाशांचा उत्साह कमी होता. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव रोड स्थानकात नव्याने थांबा देण्यात आला आहे. याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणार्यांना मोठा लाभ होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
असे आहेत दर
कोलाड-वेर्णा प्रवासासाठी प्रति वाहन 7,875 रुपये, तर कोलाड-नांदगाव रोडसाठी 5,460 रुपये आकारले जातील. बुकिंगवेळी 4,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल व उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी देय असेल. 16 पेक्षा कमी वाहने नोंदवल्यास फेरी रद्द होईल आणि शुल्क परत केले जाईल.
या रो-रो सेवेसोबतच तृतीय व द्वितीय वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. यातून एका वाहनासोबत जास्तीत जास्त तीन प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. तृतीय एसी डब्यासाठी प्रति प्रवासी 935 रुपये, तर द्वितीय एसीसाठी 190 रुपये आकारले जातील.
आतापर्यंत दोघांचीच नोंदणी
21 जुलैपासून रो-रो कार सेवेसाठी सुरू केलेल्या आरक्षण प्रक्रियेतून आतापर्यंत केवळ दोन वाहनधारकांनीच जागा निश्चित केली असून, 50 हून अधिकांनी चौकशी केली तरी प्रत्यक्ष आरक्षण टाळले आहे. परिणामी, 13 ऑगस्ट ही पूर्वीची अंतिम तारीख पुढे ढकलून आता 18 ऑगस्टपर्यंत रो-रो कार सेवेसाठी आरक्षण करता येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
कोकणातील घाटमाथ्याचा रस्ता आणि त्यातून निर्माण होणारे वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा कोकण रेल्वेच्या 50 गाड्यांची भर करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात तब्बल 350 गाड्या शिवाय अतिरिक्त रो-रो कार सेवा या कोकण मार्गावर धावतील.
संतोषकुमार झा, कोकण रेल्वेचे अध्यक्ष