Rising sea temperatures reduce sardine and mackerel catch|वाढते तापमान मच्छीमारांसाठी ठरतेय आव्हानात्मक

तापमानामुळे मासळीचे स्थलांतर; सार्डिन आणि बांगड्याच्या उत्पादनात होणार घट
representative image
Fisherman (representative image)Pudhari
Published on: 
Updated on: 

अलिबाग : किशोर सुद

राज्यातील मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असताना आता अल-निनोच्या तापमान वाढीचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणाऱ्या वाढीमुळे निर्माण झालेल्या अल निनोच्या प्रभावाचे पडसाद आता भारतीय समुद्रातील परिसंस्थेवर उमटू लागले आहेत. याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरील मत्स्य उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

मासळी अधिक अनुकूल तापमान असलेल्या खोल समुद्रात किंवा अन्य भागांत स्थलांतर करून तिच्या प्रजनन प्रक्रियेपर्यंत परिणाम होऊ शकतो. विशेषतः सार्डिन आणि बांगडा या महत्त्वाच्या मासळीच्या उत्पादनाबाबत मत्स्य संशोधकांनी चिंता व्यक्त केली असून आगामी काही महिने कोकणातील मच्छीमा-रांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

कोकणातील ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीवर १७३ मासेमारी लँडिंग सेंटर्स असून रत्नागिरी, रायगड आणि पालघर हे उत्पादनात आघाडीवर असणारे मुख्य जिल्हे आहेत. येथे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे अनेक प्रकारचे मासे मिळून येतात. यात प्रामुख्याने कोळंबी, बांगडा, बोंबील, पापलेट, सुरमई, तारली, घोळ, रावस आणि माकुळ यांचे मोठे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कोकणातील सागरी उत्पादनांमुळे राज्य मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. कोकण किनार पट्टीवर प्रति वर्षी सरासरी ३.६४ लाख ते ४.६३ लाख मेट्रिक टन सागरी मत्स्य उत्पादन होते. मात्र एकेकाळी मुबलक प्रमाणात मिळणारे मासे आता कमी होत चालले आहेत.

अनियंत्रित मासेमारी, औद्योगिक प्रदूषण, पररा ज्यांतील नौकांची घुसखोरी आणि एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असल्याने मत्स्य उत्पादनातील घसरण सुरूच आहे. तर मत्स्य उत्पादन घटण्यामागे नैसर्गिक कारणामध्ये हवामानात होणारे बदल, किनारपट्टीवर येणारी वादळे आणि प्रदूषण या घटकांचाही परिणाम होतो. आता प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणाऱ्या वाढीमुळे निर्माण झालेल्या अल निनोच्या प्रभावाचे पडसाद आता भारतीय समुद्रातील परिसंस्थेवर उमटू लागले आहेत.

मत्स्य संशोधन क्षेत्रातील अभ्या-सानुसार, समुद्राच्या तापमानातील बदल, वाऱ्यांची दिशा, समुद्री प्रवाह आणि वातावरणीय दाबातील बदल यांचा मासळीच्या अधिवासावर परिणाम होतो. त्यामुळे मासळी अधिक अनुकूल तापमान असलेल्या खोल समुद्रात किंवा अन्य भागांत स्थलांतर करू शकते. प्रजननासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल परिस्थितीत बदल झाल्यास अंडी घालण्याची प्रक्रिया, अंड्यांची उबवण आणि पिल्लांच्या जगण्याचे प्रमाणही प्रभावित होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील मत्स्य साठ्याच्या पुनर्भरणावर परिणाम होण्याची भीती आहे.

अन्नसाखळीवर परिणाम

अल निनोच्या प्रभावामुळे अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा वाढत आहे. समुद्राचे पाणी अधिक उष्ण झाल्याने मासळीला पोषक असलेल्या थंड पाण्याच्या प्रवाहांमध्ये बदल होतो. समुद्राच्या तळाकडील पोषकद्रव्यांनी समृद्ध असलेले पाणी पृष्ठभागावर येण्याच्या प्रक्रियेला बाधा निर्माण झाल्यास प्लवकांची (प्लॅक्टन) निर्मिती कमी होते. प्लॅक्टन हे अनेक लहान माशांचे प्रमुख खाद्य असल्याने संपूर्ण अन्नसाखळीवर त्याचा परिणाम होतो. परिणामी मासळीची वाढ, आकार आणि उपलब्धता कमी होण्याची शक्यता असते.

पुढील चार महिने अल निनोचा प्रभाव

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राच्या ऑक्टोबर २०२६ च्या विशेष अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव जानेवारी ते मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. समुद्राचे तापमान एप्रिल-मे २०२७ पर्यंत सामान्यपेक्षा अधिक राहू शकते. त्यामुळे आगामी काही महिने कोकणातील मच्छीमारांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष परिणामाचे प्रमाण स्थानिक समुद्री परिस्थिती आणि मान्सूनच्या स्थितीवरही अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.