Betel Nut Tree | रोठा सुपारीच्या बागांना मिळणार नवसंजीवनी

कृषी विद्यापीठात सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू
Betel nut tree
सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरूFILE
Published on
Updated on

रायगड : उंच वाढणारी सुपारीची झाडे चक्रीवादळात उन्मळून पडत असल्याचे दिसून येते. याचा प्रत्यय निसर्ग व तोक्ते वादळात आला आहे. या वादळांमुळे रायगड किनारपट्टीवरील ५० टक्क्यांहून अधिक सुपारीची झाडे उन्मळून पडली होती. यामुळे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून सुपारी संशोधन केंद्रात रोठा सुपारीची उंचीने कमी असलेली झाडांची जात विकसित करण्यात येत आहे. यामुळे झाडावरील सुपारी काढणीची कामेही सुलभ होणार असून, रोठा सुपारीच्या बागा आणि बागायतदारांना नवसंजीवनी मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग तालुक्यात सुपारीचे पीक घेतले जाते. श्रीवर्धनची रोठा सुपारी जास्त उत्पन्न देणारी आहे. मात्र, या सुपारीच्या झाडांची उंची सरासरी २२ फूट असते. वादळात ही झाडे उन्मळून पडतात. यावर उपाय म्हणून नव्याने १५ फूटांपर्यंत उंची असणाऱ्या रोठा सुपारीची झाडे विकसित करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते.

कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावून इतर कामासाठीही जागा वापरता येते. जिल्ह्यातील भौगोलिक परिसर आणि हवामान सुपारीसाठी उपयुक्त आहे. चार वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्यातील सुपारी बागांना बसला. वादळामुळे जवळपास ५० टक्केहन अधिक सुपारीच्या बागा नष्ट झाल्या होत्या. भूईसपाट झालेल्या बागांमुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर श्रीवर्धनच्या प्रसिद्ध रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. रोठा सुपारीची नव्याने लागवड करण्यासाठी रोपांचीही कमतरता भासू लागली. बाहेरील रोपे आणून त्यांची लागवड करण्यास स्थानिक बागायतदार उत्सुक नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा आणि सुपारी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून ती वितरित करावीत, अशी मागणी बागायतदारांची होती.

श्रीवर्धनच्या रोठा सुपारीला विदेशात मागणी

श्रीवर्धनची रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने रोठा सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.

सुपारीचे अधिकाधिक उत्पन्न घेणे शक्य

सुपारीच्या स्थानिक जातीची झाडे उंच वाढतात. त्यामुळे वादळात ती उन्मळून पडतात. शिवाय झाडे उंच असल्याने त्यांचे व्यवस्थापन किंवा काढणीची कामे त्रासदायक ठरतात. अशा वेळी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अन्य प्रांतातील बुटक्या जातीच्या सुपारीबरोबर रोठा सुपारीची संकरित जात विकसित करण्यात येत आहे. रोठा सुपारीची चव, गुणधर्म कायम ठेवून झाडांची उंची कमी कशी राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बागायतदारांना सुपारीचे अधिकाधिक उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.

वादळामध्ये नुकसान टळावे, यासाठी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याचे प्रयोग सुरू करण्यात आले. सध्या प्राथमिक स्तरावर वेगवेगळ्या संशोधन केंद्रांमध्ये प्रायोगिक पातळीवर लागवड करण्यात येत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास त्याचा फायदा बागायतदारांना होईल, झाडांची उंची कमी राहणार असल्याने चक्रीवादळात नुकसानीचा धोका कमी असेल. कीडरोग व इतर व्यवस्थापन तसेच काढणीचे काम सोपे जाईल.

- डॉ. एस.एन. सावंत, प्रभारी अधिकारी, सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news